कर्जमाफी असतांना युनियन बँकेकडून शेतकऱ्यांना धमक्या ; कारवाईची मागणी

0
115

जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्र शासनाने ३० जून २०२६ पर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची घोषणा केली असतानाही नशिराबाद येथील युनियन बँकेच्या अधिकाऱ्यांनी कर्जवसुलीसाठी शेतकऱ्यांवर सक्ती करणे सुरूच ठेवले आहे. शेतकऱ्यांशी फोनद्वारे आणि घरी जाऊन अरेरावीच्या भाषेत बोलणे तसेच त्यांना धमक्या देणे अशा प्रकारचा गैरव्यवहार सुरू असून, या प्रकारामुळे आधीच आर्थिक संकटात सापडलेले शेतकरी अधिक त्रस्त झाल्याने बुधवारी १० डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजता शेतकऱ्यांनी जिल्हा प्रशासनाला निवेदन सादर केले आहे.

माजी सरपंच पंकज महाजन आणि नशिराबाद येथील ग्रामस्थांनी या संदर्भात तातडीने प्रशासनाकडे हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे. गेल्या काही वर्षांत नशिराबाद परिसरात अतिवृष्टी, नापिकी आणि जमीन धूप यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी पूर्णपणे आर्थिक गर्तेत अडकले आहेत. या गंभीर परिस्थितीत, शेतकऱ्यांना आत्महत्येच्या टोकावर जाण्यापासून वाचवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी ३० जून २०२६ पर्यंत कोणत्याही बँकेने शेतकऱ्यांवर कर्जवसुलीची सक्ती करू नये, असे स्पष्ट निर्देश दिले होते.

परंतु, नशिराबाद येथील युनियन बँकेचे अधिकारी या आदेशांचे उल्लंघन करत आहेत. कर्जवसुली करताना अधिकारी शेतकऱ्यांशी अमानवी आणि अरेरावीच्या भाषेत बोलत आहेत. “कर्जमाफी मिळाली तर तुम्हाला भविष्यात बँकेकडून पुन्हा कर्ज मिळणार नाही,” अशा धमक्या देऊन ते शेतकऱ्यांवर कर्ज भरण्यासाठी दबाव आणत आहेत. यामुळे शेतकरी मानसिकरित्या खचले आहेत.

माजी सरपंच पंकज शामकांत महाजन यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, एकीकडे निसर्गाने मारले असताना दुसरीकडे बँकांची ही अनधिकृत सक्ती शेतकऱ्यांसाठी जीवघेणी ठरत आहे. त्यांनी प्रशासनाकडे तातडीने लक्ष देण्याची विनंती केली आहे.

या निवेदनात प्रामुख्याने, युनियन बँकेच्या अधिकाऱ्यांनी सुरू केलेली अनधिकृत कर्जवसुली तात्काळ थांबवण्याचे आणि शेतकऱ्यांशी गैरवर्तन करणाऱ्या अधिकाऱ्यांवर प्रशासकीय चौकशी करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच, शासनाने घोषित केलेल्या कर्जमाफीचा लाभ कोणत्याही अडथळ्याविना पात्र शेतकऱ्यांना मिळेल याची हमी देण्याची विनंतीही करण्यात आली आहे.