दुदैवी घटना : गिरणा नदी पात्रातील खड्ड्यात पडल्याने प्रौढाचा बुडून मृत्यू

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील लमांजन गावाजवळील गिरणा नदीपात्रातून जात असतांना नदीतील खड्ड्यांचा अंदाज न आल्याने बुडून एका प्रौढाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी ४ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली आहे. डोळ्यासमोरच पतीचा बुडून मृत्यू झाल्याने तसेच, दीड महिन्याभरापूर्वी मुलाचा मृत्यू झालेला असल्याने पत्नीला मोठा मानसिक धक्का बसला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पांडुरंग नामदेव मराठे (वय ५९, रा. शिवाजीनगर, यावल) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. ते पत्नी आशाबाई यांचेसह यावल येथे राहत होते. दीड महिन्यापूर्वी २४ नोव्हेंबर रोजी पांडुरंग मराठे यांचा मुलगा मनोज हा जळगावात गणेश कॉलनी परिसरात सेंट्रिंगचे काम करताना पडून मृत्युमुखी पडला होता. दरम्यान, शनिवारी ४ जानेवारी रोजी पांडुरंग मराठे हे पत्नी आशाबाई यांचेसह एरंडोल तालुक्यात खर्ची येथे आले होते. तेथून लमांजन येथील नातेवाईक गोकुळ मराठे यांचेकडे जाण्यासाठी निघाले होते. दुपारी ३ वाजेच्या सुमारास गिरणा नदी ओलांडत असताना नदीत वाळूउपसामुळे पडलेल्या खड्ड्यामध्ये ते पडले. पाणी खोल असल्याने ते बुडायला लागले.

दरम्यान, पत्नी आशाबाई यांनी आरडाओरड केली. परिसरातील ग्रामस्थ धावून आले. त्यांनी पांडुरंग मराठे यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी नेले असता तेथे वैद्यकीय अधिकारी यांनी तपासून मयत घोषित केले. यावेळी त्यांच्या पत्नीने मन हेलावणारा आक्रोश केला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आला आहे.

Protected Content