जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातून गेलेल्या अजिंठा चौकात बुधवारी ९ ऑक्टोबर रोजी पहाटे ३ वाजता अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत ५२ वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर महिलेचे पती हे गंभीर जखमी झाले आहे. या भीषण अपघातात महिलेचे डोकं थेट धडापासून वेगळे झाले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनावरील चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिता सुनील राणे (वय ५२, रा.सदगुरुनगर, जळगाव) असे मयत महिलेचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, अनिता राणे या बुधवारी ९ ऑक्टोबर रोजी. पहाटे ३ वाजेच्या सुमारास पती सुनील बाबुराव राणे यांच्यासोबत सदगुरुनगरातून दुचाकिने रिंगरोड भागात बांधकाम सुरु असलेल्या त्यांच्या घराकडे पाणी भरायला जात होते. अजिंठा चौकातून दुचाकीने जात असतांना समोरून आलेल्या एका अज्ञात वाहनाने राणे दांम्पत्य बसलेल्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत अनिता राणे यांचे डोकं थेट धडापासून वेगळे झाले. त्यामुळे त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. तर पती सुनील राणे यांनाही मार लागला. पहाटेची वेळ असल्याने रस्त्यालगत कोणीही नव्हते, त्यामुळे दांम्पत्याला उडविणाऱ्या वाहनचालकाने घटनास्थळाहून पळ काढला. एका रिक्षा चालकाला अपघात झाल्याचे कळल्यानंतर याबाबत त्याने एमआयडीसी पोलिसांना कळविले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनावरील अज्ञात चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिता राणे यांच्या पश्चात पती, मुलगा तन्मय, मुलगी आदिती असा परिवार आहे.