चोपडा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चोपडा तालुक्यातील विरवाडे येथील प्रौढ व्यक्तीचा मालापूर येथील गुळ धरणात पाय घसरून पडल्याने बुडून दुदैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दुपारी उघडकीला आले आहे. या घटनेमुळे विरवाडे गावात शोककळा पसरली आहे. याबाबत चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. नितीन प्रविणसिंग पाटील (वय-४५) रा.विरवाडे ता. चोपडा असे मयताचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, चोपडा तालुक्यातील विरवाडे येथील डिप्लोमा इलेक्ट्रिक इंजिनीअर झालेले तरुण शेतकरी नितीन प्रविणसिंग पाटील (वय-४५) हे शनिवारी ३१ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता विरवाडे गावापासून चार किलोमीटर अंतरावर सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या मालापूर येथील गुळ धरणावर फिरायला गेले. दुपारी १२ वाजेच्या सुमारास नितीन प्रविणसिंग पाटील त्यांचा पाय घसरल्याने धरणाच्या १५ मीटर खोल पाण्यात पडले, त्यात त्यांचा बुडून मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर विरवाडे गावात समजताच कुटुंबियांसह नातेवाईक आणि ग्रामस्थांनी गुळ धरण गाठले.
त्यानंतर चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांच्यासह पथक घटनास्थळी दाखल झाले. पट्टीचे पोहणारे कैलास नारायण शिरसाठ, नारायन गोपीचंद शिरसाठ, सुनील नारायण शिरसाठ, श्रीराम गोपीचंद शिरसाठ, उत्तम सुका सोनवणे, नारायण देविदास भिल यांच्या सहकार्याने मृतदेह बाहेर काढण्यात आला. व चोपडा उपजिल्हा रूग्णालयात रवाना करण्यात आला. याबाबत चोपडा ग्रामीण पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयताच्या पश्चात पश्चात आईवडील, पत्नी व एक मुलगा असा परिवार आहे.