जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | रात्री जेवण केल्यानंतर झोपेत उलटी घशात अडकल्यामुळे गणपती नगरातील १६ वर्षीय मुलीचा झोपेतच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी पहाटे ५ वाजता समोर आली आहे. या प्रकरणी रामानंद नगर पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. जिज्ञासा नरेंद्र निकुंभ (वय १६, रा.गणपती नगर) असे मयत मुलीचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जिज्ञासाचे वडिल नरेंद्र निकुंभ हे शहरातील जिएसटी विभागात जिएसटी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. जिज्ञासा ही शहरातील छत्रपती शिवाजी महाराज विद्यालयात अकरावीचे शिक्षण घेत होती. गुरुवारी ८ ऑगस्ट रोजी सकाळी ६ वाजता जिज्ञासाचे क्लास असायचे, त्यासाठी पहाटे ५ वाजता जिज्ञासाची आई तिला उठविण्यासाठी गेली असता, तिचे शरीर पूर्णपणे थंड पडलेले आढळून आले. लागलीच जिज्ञासाला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचाराआधीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. रात्री झोपेत तिच्या घशात उलटी अडकल्याने तिचा मृत्यू झाल्याचा अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला आहे. जिज्ञासा अतिशय हुशार व मेहनती असल्याने, तिच्या अचानक मृत्यूमुळे आई-वडिलांना मोठा धक्का बसला आहे. तिच्या पश्चात आई, वडिल व लहान बहिण असा परिवार आहे. जिज्ञासाच्या नातेवाईकांनी दिलेल्या महितीनुसार रात्री १२ वाजेपर्यंत तिने अभ्यास केला होता. त्यानंतर ती झोपली, दरम्यान, तिला याआधी कोणताही आरोग्यासंबधी त्रास नसल्याचीही माहिती नातेवाईकांनी दिली. याप्रकरणी रामानंद नगर पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.