विषारी औषध तोंडात गेल्याने सफाई कर्मचाऱ्याचा उपचारादरम्यान दुदैवी मृत्यू

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पोलीस ठाण्याच्या आवारात साफसफाई करत असताना स्वच्छता करण्यासाठी औषधाची बाटली उघडताना तोंडात विष गेल्याने सफाई कर्मचाऱ्यांच्या उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना सोमवारी ५ ऑगस्ट रोजी सकाळी ६ वाजता घडली आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. विजय दिलीप गोयर वय-३९, रा. पहूर ता.जामनेर असे मयत झालेल्या सफाई कर्मचाऱ्यांचे नाव आहे.

या संदर्भात अधिक माहिती अशी की विजय दिलीप गोयर हे आई, पत्नी, दोन मुलं यांच्यासह पहूर येथे वास्तव्याला होते. गेल्या १५ वर्षांपासून पहूर पोलीस ठाण्यात स्वच्छता कर्मचारी म्हणून कामाला होते. दरम्यान रविवारी ४ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास पोलीस ठाण्याच्या आवारात स्वच्छता करत होते. स्वच्छतेसाठी लागणारी औषधाची बाटली उघडत असताना अचानकपणे औषध हे तोंडात गेले. त्यामुळे त्यांना अस्वस्थ वाटू लागले. ही बाब लक्षात आल्यानंतर पोलीस ठाण्याच्या आवारातील कर्मचाऱ्यांनी तातडीने खाजगी वाहनातून दाखल करत जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू असताना सोमवारी ५ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० वाजता उपचारादर मृत्यू झाला आहे. याबाबत जिल्हापेठ पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मयताच्या पश्चात आई लिलाबाई, पत्नी राधिका, दोन भाऊ आणि दोन मुलं असा परिवार आहे. तरुण मुलाचे आकस्मात निधनामुळे गोयर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान या घटनेनंतर पोलिसांकडून त्यांना तातडीची आर्थिक मदत देण्यात आली आहे.

Protected Content