नागपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | समृध्दी महामार्गाच्या प्रवेशाजवळ अवैधरित्या गाईची तस्करी करणाऱ्या वाहन उलटल्याने मोठा अपघात झाला आहे. या अपघातातील चार गाईंचा दुदैवी मृत्यू झाला. ही घटना मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागपूर जिल्ह्यातील कामठी येथून निघालेले हे वाहन समृद्धी महामार्गावरून अवैधरित्या गाईची तस्करी करत होते. या प्रकरणातील वाहनचालक जुबेर जान मोहम्मद कुरेशी आणि रिझवान उर्फ रिझु रौब खान दोघे ही कामठीचे रहिवासी आहेत. यात संशयित आरोपींनी गाडीमध्ये तब्बल १३ गाई कोंबून भरल्या होत्या. त्यानंतर ते समृद्धी मार्गाने वर्धेकडे जाण्यासाठी निघाले असता समृद्धीच्या प्रवेशाजवळ भरधाव वाहन रस्त्याच्या कडेला जाऊन उलटले. त्यामुळे गाडीतील सर्व गाई खाली फेकल्या गेल्या. यामध्ये ४ गाईंचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघाताच्या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
या अपघातात दोन्ही संशयित आरोपी किरकोळ जखमी झाले होते. त्यांच्यावर उपचार करण्यात आले. तसेच मृत गाईंचा पंचनामा करण्यात आला. उर्वरित ९ गायींना नागपूर येथील गोरक्षण समितीकडे देण्यात आले आहे. या प्रकरणी गाडी चालक आणि अन्य एका संशयित आरोपीस प्राण्यांचा छळ प्रतिबंधक कायद्यानुसार अटक केली आहे. पुढील तपास पोलिस करत आहे.