भुसावळ- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । रावेर तालुक्यातील निंभोरा रेल्वे स्थानकावर पठाणकोट एक्सप्रेसचा थांबा पूर्ववत करण्याच्या मागणीसाठी आता जनक्षोभ उसळला असून रेल्वे प्रशासनाला अंतिम इशारा देण्यात आला आहे. निंभोरा व परिसर गाव सेवा समितीच्या वतीने आज शनिवारी, २४ जानेवारी रोजी मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक (डीआरएम) पुनीत अग्रवाल यांची भेट घेऊन ५ हजार ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्यांचे निवेदन सोपवण्यात आले. येत्या दहा दिवसांत जर सकारात्मक निर्णय झाला नाही, तर कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय आणि तारखेची घोषणा न करता ‘गनिमी काव्याने’ आकस्मिक रेल रोको व जेलभरो आंदोलन करण्याचा पवित्रा समितीने घेतला आहे. या आंदोलनाचे नेतृत्व समितीचे प्रमुख संयोजक विवेक ठाकरे करत असून, प्रशासनाने आंदोलनाची तीव्रता लक्षात घ्यावी, असा इशारा यावेळी देण्यात आला.
स्वातंत्र्योत्तर काळापासून पठाणकोट एक्सप्रेसला निंभोरा येथे अधिकृत थांबा होता. मात्र, कोरोना महामारीनंतर सुरू झालेल्या रेल्वे सेवांमध्ये हा थांबा अचानक रद्द करण्यात आला. यामुळे परिसरातील व्यापारी, विद्यार्थी, रुग्ण आणि सामान्य प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. या अन्यायाविरुद्ध गेल्या अनेक दिवसांपासून टप्प्याटप्प्याने आंदोलन केले जात आहे. ३ जानेवारी रोजी निंभोरा येथे पार पडलेल्या ‘एल्गार सभे’नंतर दुसऱ्या टप्प्यात ५ हजार लोकांच्या सह्यांची मोहीम राबवण्यात आली होती. रेल्वेचा गोपनीय विभाग आणि स्थानिक पोलीस प्रशासन यांनी या परिस्थितीचा अहवाल वरिष्ठ स्तरावर पाठवूनही रेल्वे बोर्डाकडून अद्याप कोणतीही हालचाल न झाल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट आहे.

डीआरएम कार्यालयावर पोहोचण्यापूर्वी समितीच्या कार्यकर्त्यांनी कार्यालयाबाहेर जोरदार निदर्शने केली. हातात फलक आणि झेंडे घेऊन ‘पठाणकोटला थांबा मिळालाच पाहिजे’, ‘असे कसे थांबत नाही, थांबविल्याशिवाय राहत नाही’ अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. यावेळी डीआरएम पुनीत अग्रवाल यांनी शिष्टमंडळाची भेट घेऊन चर्चा केली. ग्रामस्थांच्या भावना समजून घेत, ५ हजार सह्यांचा हा प्रस्ताव तात्काळ रेल्वे बोर्डाकडे पाठवून थांब्यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. मात्र, केवळ आश्वासनावर न थांबता प्रत्यक्ष कृतीची मागणी आंदोलकांनी लावून धरली आहे.
या आंदोलनाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे समितीने मांडलेली ‘जेलभरो’ची भूमिका. जर मागणी मान्य झाली नाही, तर पंचक्रोशीतील शेतकरी केवळ स्वतःच नव्हे, तर आपल्या बैलगाड्या, ट्रॅक्टर आणि गुरे-ढोरांसह रेल्वे रुळावर उतरतील. विशेष म्हणजे, अटक झाल्यानंतर जोपर्यंत अधिकृत थांबा जाहीर होत नाही, तोपर्यंत कोणीही जामीन घेणार नाही, अशी टोकाची भूमिका विवेक ठाकरे यांनी स्पष्ट केली आहे. या निदर्शन प्रसंगी मोहन बोंडे, धनंजय ठाकरे, दीपक मोरे, विजय सोनार, धनश्री ठाकरे, दस्तगीर खाटीक, विनोद राठोड, ईश्वर कोळी, इम्रान शेख यांसह शेकडो कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.



