Home Cities जळगाव उलेमा-ए-हिंदची अल्पसंख्याक कल्याण योजना प्रभावीपणे राबविण्याची मागणी

उलेमा-ए-हिंदची अल्पसंख्याक कल्याण योजना प्रभावीपणे राबविण्याची मागणी


जळगाव–लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । राष्ट्रीय अल्पसंख्याक दिनाच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातील अल्पसंख्याक समुदायाच्या विविध प्रश्नांना नव्याने वाचा फुटली असून, जमियत उलेमा-ए-हिंद जळगावच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी जिल्हा दंडाधिकारी रोहन घुगे यांच्याशी सविस्तर बैठक घेऊन केंद्र व राज्य शासनाच्या अल्पसंख्याक कल्याण योजना तातडीने आणि प्रभावीपणे राबविण्याची जोरदार मागणी केली आहे. जिल्ह्यातील अलीकडच्या काही घटनांमुळे अल्पसंख्याक समाजात असुरक्षिततेची भावना वाढत असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.

जिल्हा नियोजन भवन आयोजित जिल्हा प्रशासनाच्या राष्ट्रीय अल्पसंख्याक दिन कार्यक्रमात जमियत उलेमा-ए-हिंद जळगावच्या पदाधिकाऱ्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला. कार्यक्रमानंतर जमियतच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यालयात जिल्हा दंडाधिकारी रोहन घुगे यांची औपचारिक भेट घेतली. या बैठकीत अल्पसंख्याक समुदायाने समाज, शिक्षण, अर्थव्यवस्था आणि सामाजिक सलोख्यासाठी दिलेल्या योगदानावरही प्रकाश टाकण्यात आला.

यावेळी जमियत उलेमा-ए-हिंदचे नायब सदर मौलाना इम्रान अझहरी यांनी जिल्हा दंडाधिकाऱ्यांना संबोधित करताना सांगितले की, जिल्ह्यात घडणाऱ्या विविध घटनांमुळे अल्पसंख्याक समुदायात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पंतप्रधानांचा अल्पसंख्याक विकास कार्यक्रम, विविध शिष्यवृत्ती योजना तसेच गृहनिर्माण योजना या कागदावरच न राहता प्रत्यक्षात प्रभावीपणे राबवल्या गेल्या पाहिजेत, तरच समाजाची सर्वांगीण प्रगती साधता येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

या बैठकीला जमियत उलेमा-ए-हिंद जळगावचे सदर मौलाना नूरुद्दीन इशाती, सरचिटणीस रगीब अहमद, उपाध्यक्ष अनीस इकॉनॉमिकल, जामनेरचे सदर मुफ्ती मसूद, जळगाव तालुक्याचे सदर मौलाना साजिद व सचिव मौलाना शोएब, तसेच भुसावळचे सचिव जमील साहिब आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. सर्वांनी एकमताने अल्पसंख्याकांच्या तक्रारी तातडीने सोडविण्याची आवश्यकता अधोरेखित केली.

बैठकीदरम्यान अल्पसंख्याक समुदायाच्या प्रश्नांवर संवेदनशीलतेने विचार करून सामाजिक सलोखा राखण्यासाठी प्रशासन व समाज यांच्यात संयुक्त प्रयत्न व्हावेत, अशी अपेक्षा पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. जिल्हा दंडाधिकारी रोहन घुगे यांनी उपस्थितांच्या चिंता लक्षपूर्वक ऐकून घेतल्या असून, अल्पसंख्याक कल्याण योजनांच्या अंमलबजावणीबाबत सकारात्मक भूमिका घेत संबंधित विभागांना आवश्यक निर्देश देण्याचे आश्वासन दिले.


Protected Content

Play sound