मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | महाशिवरात्रीच्या आदल्या दिवशी शिवधनुष्य चोरीला गेले असले तरी या गद्दारांना गाडल्याशिवाय राहणार नाही असे खुले आव्हान उध्दव ठाकरे यांनी दिले आहे. आज उघड्या जीपवरून भाषण करतांना त्यांनी विरोधकांवर कडाडून प्रहार केले.
काल केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालानंतर उद्धव ठाकरे यांनी आक्रमक पवित्रा धारण केला आहे. आज त्यांनी शिवसेना भवनाच्या बाहेर उघड्या कारमध्ये उभे राहून शिवसैनिकांशी संवाद साधला आहे. ज्या पद्धतीने आपले शिवसेना हे नाव चोराला दिले. आपला पवित्र धनुष्यबाण हा चोराला दिला. ज्यांनी धनुष्यबाण चोरला ते मर्द असतील तर त्यांनी चोरलेला धनुष्यबाण घेऊन निवडणुकीत यावं. मी मशाल घेऊन तुमच्यासमोर उभा राहतो. बघुया काय होतं तर. धनुष्यबाण पेलायलाही मर्द लागतो. रावणाने शिवधनुष्य उचलण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तो उताणा पडला होता. तसेच हे चोर आणि चोरबाजाराचे मालक शिवधनुष्य पेलताना उताणे पडल्याशिवाय राहणार नाहीत, असा घणाघात ठाकरे यांनी केला.
यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, आपण पुन्हा एकजुटीने लढू. चोरांचा आणि चोरबाजाराचा नायनाट करू असे म्हणत शिवसेना संपवण्याचा डाव सुरू आहे. मात्र, शिवसेना संपवता येणार नाही. मी खचलो नाही. खचणार नाही. तुमच्या ताकदीवर मी उभा आहे. जोपर्यंत तुम्ही आहात तोपर्यंत चोर आणि चोरबाजारांच्या मालकांना गाडून त्यांच्या छाताडावर उभा राहील असे कडाडतांनाच त्यांनी आपल्या समर्थकांनी निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आवाहन केले.
ठाकरे म्हणाले की, आज महाशिवरात्र आहे उद्या शिवजयंती आहे, जणू काही या दिवसांचा मुहूर्त बघून शिवसेना हे नाव चोरलं गेलंय, धनुष्यबाण चोरलं गेलेलं आहे. पण ज्यांनी हे चोरलंय त्यांना हे माहिती नाही की त्यांनी मधमाशांच्या पोळ्यावर दगड मारला आहे. आजपर्यंत त्यांनी मधमाशांनी जमवलेला मधाचा आस्वाद घेतला आहे पण त्यांना अद्याप मधमाशांचा डंख लागलेला नाही. तो डंख आता करायची वेळ आलेली आहे.