मुंबई (वृत्तसंस्था) ‘महाराष्ट्रात युतीचेच सरकार येणार, राज्याचा विकास करण्यासाठी आम्हाला सत्ता हवी आहे’, असे विधान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तीन नवीन मेट्रोचे मार्ग आणि मेट्रो भवनाचे भूमिपूजन करण्यात आले. या कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी हे विधान केले आहे. यानिमित्ताने उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोरच विधानसभा निवडणुकीसाठी युतीवर शिक्कामोर्तब केले आहे.
आगामी पाच वर्षांत पायाभूत सुविधांवर १०० लाख कोटी रुपये खर्च करणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. मुंबईमध्ये मेट्रो भवन आणि मेट्रो ११ आणि १२ या दोन मार्गांचे भूमीपूजन आज त्यांच्या हस्ते झाले. आपल्या भाषणाची सुरूवात मराठीत करताना पंतप्रधानांनी उद्धव ठाकरेंचा उल्लेख आपला लहान भाऊ असा केला. सर्वांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देताना त्यांनी गणपती बाप्पा मोरया असा जयघोषही केला. आपल्या पहिल्याच जाहीर कार्यक्रमात उपस्थित असलेले नवनियुक्त राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे अभिनंदन करताना त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण काम केल्याचा आवर्जून उल्लेख केला.
यावेळी उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, देशाच्या अस्मितेचे विषय आपण सक्षमतेने हाताळत आहात. मोदींच्या रुपाने देशाला समर्थ नेतृत्त्व मिळाले आहे. नरेंद्र मोदींनी चंद्रालाही गवसणी घातली आहे. असेही कौतुक यावेळी उद्धव ठाकरेंनी केले. तर उद्धव ठाकरेंनी यावेळी आता समान नागरी कायदा आणि राम मंदिराचे स्वप्नही पूर्ण करू असा निर्धार व्यक्त केला.