Home राजकीय उद्धव ठाकरेंना जबर धक्का, कार्यकर्त्यांचा शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश

उद्धव ठाकरेंना जबर धक्का, कार्यकर्त्यांचा शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश


चिपळूण- वृत्तसेवा । राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा प्रभावी राजकीय डाव टाकत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला मोठा धक्का दिला आहे. विविध भागांतील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश केल्याने राज्यातील राजकीय समीकरणांमध्ये बदल होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा पार्श्वभूमीवर पक्षांतरांची मालिका सुरू असतानाच हा मोठा राजकीय धक्का मानला जात आहे. कोकण आणि विदर्भ या दोन महत्त्वाच्या प्रदेशांतून मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त्यांनी सत्ताधारी शिवसेनेकडे कल दाखवला आहे. त्यामुळे संघटनात्मक बळकटी मिळवत शिंदे गटाने आपली ताकद अधिक मजबूत केली आहे.

या पक्षप्रवेशाबाबत माहिती देताना एकनाथ शिंदे यांनी सोशल मीडियावरून सांगितले की, चिपळूणचे युवासेना विस्तारक उमेश खलाटे, उरणचे माजी जिल्हाप्रमुख विनोद साबळे आणि हिंगणा मतदारसंघातील नगरसेवक सुरेंद्र गौतम यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी भगवा झेंडा हाती घेत शिवसेनेत प्रवेश केला. या घडामोडींमुळे ठाकरे गटाला स्थानिक पातळीवर मोठा फटका बसल्याचे मानले जात आहे.

कोकणातील चिपळूण भागातून विजय शिर्के, ओंकार पंडित, दिप्ती सावंत देसाई, इकबाल बेबल, विराज खताते, समीर कदम यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंधित काही कार्यकर्त्यांनीही शिवसेनेत प्रवेश केला. उरणमधून उपसरपंच अमर म्हात्रे, सुनंदा म्हात्रे, संकल्प घरत आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी पक्षांतर करत शिंदे गटाला पाठिंबा दिला. तसेच महिला पदाधिकाऱ्यांचाही मोठा सहभाग या प्रवेशात दिसून आला.

विदर्भातील हिंगणा मतदारसंघातही गजेंद्र काकडे, राजेंद्र गिरडकर, नरेश देवगडे, अनिकेत चित्तराम आणि इतर अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेचा झेंडा स्वीकारला. या पक्षप्रवेश कार्यक्रमाला उद्योगमंत्री उदय सामंत, राज्यमंत्री आशिष जयस्वाल, मंत्री भरतशेठ गोगावले, खासदार श्रीरंग बारणे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.


Protected Content

Play sound