मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | मराठा आरक्षणावरून राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. सत्ताधाऱ्यांनी विरोधक दुटप्पी भूमिका घेत आहेत असा आरोप केला आहे. त्यामुळे शरद पवार, उद्धव ठाकरे आणि नाना पटोले यांनी भूमिका स्पष्ट करावी असे आव्हान भाजपने दिले होते. त्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी भाजपचेच टेन्शन वाढवले आहे. त्यांनी मराठा आरक्षणावर कसा तोडगा निघू शकतो हे स्पष्ट केले आहे. त्यांनी यामुद्द्यावर रोखठोक भूमिका घेत सरकार आणि भाजपचीच कोंडी केली आहे. त्याला आता भाजपकडून काय उत्तर येते हे पाहावे लागणार आहे.
मराठा आरक्षणाबाबत उद्धव ठाकरे यांनी भूमिका स्पष्ट करावी अशी सतत भाजप आणि शिवसेना शिंदे गटाकडून मागणी होत होती. यावर उद्धव ठाकरे यांनी रोखठोक भूमिका मांडली आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहीजे ही शिवसेनेची स्पष्ट भूमिका आहे. आरक्षणाची मर्यादा वाढवणे हे कोणत्याही राज्य सरकारच्या हातात नाही हेही सत्य आहे. आरक्षणाची मर्यादा वाढवायची असेल तर तसा निर्णय केंद्र सरकारने घेणे गरजेचे आहे. त्यामुळे सर्वांनी मिळून या प्रश्नी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेटले पाहीजे. आरक्षणाबाबत मोदींनी निर्णय घ्यावा. ते जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल. मराठा, ओबीसी, धनगर, आदिवासी यांना दुखवायचं की नाही हे मोदींनी सांगावे. आरक्षणाची मर्यादा वाढवणारे विधेयक त्यांनी संसदेत आणावे. शिवसेनेचे खासदार त्याला पाठींबा देतील असे ठाकरे यांनी सांगितले. त्यासाठी इथे भांडत राहण्या पेक्षा सर्वांनी मिळून दिल्लीला जावू , तिथे मोदींना भेटू असेही ठाकरे यावेळी म्हणाले.
आमचे सरकारपाडून अडीच वर्षे झाली. पण या सरकारला मराठा आरक्षणाबाबत तोडगा काढता आला नाही. यांचे राज्य असे पर्यंत ते तोडगा काढतील असे वाटत नाही. शिवसेनेची मराठा आरक्षणाबाबतची भूमिका स्पष्ट आहे. मात्र राज्य सरकारने आरक्षणासाठी जी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती ते म्हणजे सरकारचे नाटक होते असा हल्लाबोलही उद्धव ठाकरे यांनी केला. राजकारण्यांना चर्चेसाठी बोलवण्या पेक्षा सर्व समाजाच्या नेत्यांना बोलवणे गरजेचे होते. त्यांच्यात चर्चा आणि सुसंवाद होणे गरजेचे होते असेही ठाकरे यावेळी म्हणाले. मात्र हे करायचे सोडून समाजा समाजात भांडणं लावली जात आहे. त्यांना एकमेकांत लढवलं जात आहे. त्यातून आपल्या राजकीय पोळ्या भाजण्याचा डाव आहे असा आरोपही ठाकरे यांनी केला. त्यांचे हे स्वप्न यशस्वी होवू देवू नका असे आवाहन ही ठाकरेंनी या निमित्ताने केले.
पुर्वीचा भाजप आणि आताचा भाजप यांच्यात जमिन-आस्मानचा फरक असल्याचे ठाकरे म्हणाले. सध्याचा भाजप हा घृष्णास्पद आणि अमानुष आहे. अनिल देशमुखांना आलेला अनुभव त्यांनी सांगितल आहे. त्यांनी याबाबतची माहिती आपल्याला आधीच दिली होती असेही ते म्हणाले. त्यामुळे घृष्णास्पद काम करणारी लोक सध्या भाजपात आहेत. घाणेरडे आरोप करायचे, मुलाबाळांचे आयुष्य बरबाद करायचे. हे करत असताना त्यांनीही विसरू नयेत की त्यांनाही मुलबाळं आहेत. ज्यावेळी त्यांच्यावरही असे आरोप होतील तेव्हा त्यांना समजेल काय त्रास होतो ते. मात्र भाजपची ही वृत्ती नष्ट करायची आहे असेही ते यावेळी म्हणाले. मातोश्री येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.