Home राजकीय बेस्ट निवडणुकीत उद्धवसेना-मनसे युतीचा पराभव ; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

बेस्ट निवडणुकीत उद्धवसेना-मनसे युतीचा पराभव ; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया


मुंबई-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा। राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरलेली उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांची युती अखेर बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत कसोटीला उतरली, मात्र हा प्रयोग सपशेल अपयशी ठरला. उत्कर्ष पॅनलच्या माध्यमातून एकत्र आलेल्या उद्धवसेना आणि मनसेच्या उमेदवारांचा २१ पैकी एकाही जागेवर विजय न झाल्यामुळे युतीला मोठा धक्का बसला आहे. यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पहिल्यांदाच मौन सोडत आपली प्रतिक्रिया दिली आहे, मात्र त्यांनी ही संपूर्ण निवडणूक ‘लहान गोष्ट’ म्हणून संबोधत चर्चेपासून अलिप्त राहण्याचा प्रयत्न केला.

बेस्ट क्रेडिट सोसायटीच्या निवडणुकीत कामगार नेते शशांक राव यांच्या पॅनलने १४ जागांवर विजय मिळवला असून, भाजप आमदार प्रसाद लाड यांच्या सहकार समृद्धी पॅनलने ७ जागांवर झेंडा फडकवला. ठाकरे बंधूंच्या उत्कर्ष पॅनलला एकही जागा मिळाली नाही. परिणामी, या युतीचा ‘राजकीय ब्रँड’ देखील प्रश्नचिन्हात आला आहे.

या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी दुसऱ्याच दिवशी सकाळी वर्षा निवासस्थानी जाऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या बैठकीसंदर्भात अनेक तर्कवितर्क लढवले गेले. यानंतर राज ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत, ही भेट विविध शहरी समस्यांवर चर्चा करण्यासाठी होती, असे सांगितले.

पत्रकारांनी बेस्ट निवडणुकीबाबत विचारल्यावर राज ठाकरे म्हणाले, “काय आहे ते? मला याची माहितीच नाही. ही स्थानिक निवडणूक आहे. पतपेढी, काहीतरी आहे ना. ठीक आहे, ही सगळी लहान गोष्टी आहेत. तुम्हाला २४ तास काहीतरी दाखवायला हवे असते,” असे म्हणत त्यांनी या विषयावर अधिक बोलणे टाळले. त्यांच्या या प्रतिक्रिया राजकीय संकेत देणाऱ्या वाटल्या, तर काहींनी त्याकडे युतीपासून माघार म्हणूनही पाहिले.

यावेळी राज ठाकरे यांनी शहरी व्यवस्थापनाबाबत भाष्य करत, “शहरात शिस्त नसल्यामुळे अडचणी वाढत आहेत. गाड्या पार्क करण्यासाठी योग्य व्यवस्था नसणे, वाहन परवाने देताना प्रशिक्षणाचा अभाव आणि प्रशासनाची जबाबदारी यावर त्यांनी लक्ष वेधले. अर्बन नक्षलपेक्षा आधी शहरात शिस्त लागली पाहिजे,” असेही ते म्हणाले.


Protected Content

Play sound