मुंबई प्रतिनिधी । राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी पुन्हा एकदा इव्हीएममध्ये घोळ असल्याचा आरोप करत आपल्या मतदारसंघात मतपत्रीकांद्वारे निवडणूक घेण्याची मागणी केली आहे.
काही दिवसांपूर्वीच उदयनराजे यांनी लोकसभेचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवत आपल्या मतदारसंघात मतपत्रीकांच्या माध्यमातून निवडणूक घेण्याची मागणी केली होती. याचाच पुनरूच्चार त्यांनी मुंबई येथील पत्रकार परिषदेत केला. ते म्हणाले की, कॉम्प्युटरसारखे मशीन जर हॅक होऊ शकत असेल तर ईव्हीएमही हॅक होऊ शकते. त्यामुळे ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरचा वापर करायला हवा. विकसित देश एव्हीएम सोडून बॅलेट पेपर वापरत आहेत.बॅलेट पेपर हे आर्थिकदृष्ट्या परवडणारे आहे. एव्हीएमला ३३,००० रूपये खर्च येतो तर बॅलेट पेपर बॉक्सला ३३० रुपये खर्च येतो. त्यामुळे पैशांची बचत होईल. सातारा लोकसभेची पोटनिवडणूक घेतल्यास बॅलेट पेपर बॉक्सचा खर्च करण्याची तयारी असल्याचे त्यांनी सांगितले.
विशेष बाब म्हणजे, सातार्यातली फेरनिवडणूक बॅलेट पेपरवर घ्या, जर त्यानंतर निकालात असाच फरक आढळला तर मिशाच नाही भुवयाही काढून फिरेन असे खुले आव्हानदेखील उदयनराजे भोसले यांनी निवडणूक आयोगाला दिले आहे.