उदय सामंतांनी घेतली मनोज जरांगे यांची भेट

जालना-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आला आहे. राजकीय वर्तुळात अनेक घडामोडी घडत असून भेटीगाठी घेतल्या जात आहेत. याच पार्श्वभूमीवर आता उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पुन्हा एकदा अंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे.

यावेळी दोघांमध्ये २५ मिनिटे चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच, उदय सामंत यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ओएसडी मंगेश चिवटे देखील उपस्थित होते.
विधानसभा निवडणुकीसाठी सर्व पक्षांच्या उमेदवारी याद्या जाहीर झाल्यानंतर आम्ही निर्णय घेणार आणि उमेदवार जाहीर करणार, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले होते. तसेच, उमेदवारांची चाचपणी देखील सुरू केली आहे, असेही मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले होते. यानंतर उदय सामंत यांनी जरांगे पाटील यांची भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

दरम्यान, या भेटीबाबत उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी आमच्या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झालेली नाही, असे उदय सामंत यांनी सांगितले.
मी माझ्या काही सहका-यांचे एबी फॉर्म पक्षामार्फत घेऊन आलो होतो. यादरम्यान, मी मनोज जरांगे पाटील यांना विचारले त्यांना वेळ आहे का, ते दिवसभर कामात व्यस्त असतात. काल मला समजले आज ते कामातून थोडे मोकळे झाले आहेत, त्यामुळे एक मित्र म्हणून मी त्यांना भेटावे, बोलावे या उद्देशाने आलो होतो.

Protected Content