एरंडोल प्रतिनिधी । तालुक्यातील दौलतपुरा येथील बंधार्यात तोल गेल्यामुळे पडलेला तरूण व त्याला वाचवण्यासाठी प्रयत्न करणारा त्याचा मित्र असे दोन बुडाले असून त्यांच्या मृतदेहाचा शोध सुरू आहे.
याबाबत वृत्त असे की, शहरातील कागदीपुरा परिसरातील रहिवासी असलेले रईस अहमद रफिओद्दीन (वय ३८), अस्लम शहाबुद्दीन (वय ३३), शेख शकिल शेख मुस्ताक (वय ३५) आणि अब्दुल रहमान नदीम अहमद (वय १५) हे चारही युवक हे नागदुली शिवारातील दौलतपुरा बंधारा येथे ४ ऑगस्टला सायंकाळी गेले होते. यातील अब्दुल रहमान नदीम अहमद हा हातपाय धुण्यासाठी बंधार्यात उतरला असता तो घसरून पाण्यात पडला. त्याला वाचवण्यासाठी शेख शकील शेख मुश्ताक हा पाण्यात उतरला. मात्र, हे दोघे ही युवक पाण्यात बुडाले. सोबतच्या युवकांनी ही माहिती घरी देताच सर्वांनी धावपळ करत बंधारा गाठला.
स्थानिक पोलिसांनी बुडालेल्या दोघा युवकांना शोधण्याचा प्रयत्न केला मात्र उशिरापर्यंत त्यांना यश आले नाही. दरम्यान, आज सकाळी पुन्हा या युवकांचा शोध घेतला जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.