धरणगाव, प्रतिनिधी| येथील रेल्वे स्थानकावर रोजंदारीने काम करणाऱ्या होमगार्ड असलेल्या विजय सुरेश रोकडे व स्वप्निल बडगुजर या दोघा तरुणांनी आज (दि.१०) सकाळी स्टेशनवर काम करत असताना एका दाम्पत्याची दोन लाख रुपये असलेली हरवलेली बॅग शोधून काढून त्यांना परत मिळवून दिली. या कामगिरीबद्दल त्या दोघांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
सविस्तर माहिती अशी की, सुरत-भुसावळ पॅसेंजरने हरचंद सुकलाल महाजन, जिजाबाई हरचंद महाजन हे एरंडोल येथील प्रवासी ७.३० ला उतरले. त्यांनी एरंडोल येथे जाण्यासाठी धरणगाव बस स्टँडपर्यंत येण्यासाठी रिक्षा केली, त्यानंतर ते एरंडोल येथे घरी गेल्यावर त्यांना कळले की, आपली बॅग हरवली आहे. त्यात दोन लाख रुपये रोख होते. तब्बल दोन तासानंतर त्यांनी धरणगाव येथे स्टेशनवर येऊन तपास केला मात्र त्यांना बॅग मिळत नसल्याने ते आक्रोश करताना पाहून विजय रोकडे व स्वप्निल बडगुजर यांनी त्यांची विचारपूस केली. त्यांना रिक्षाचा नंबरसुध्दा माहित नव्हता, परंतु रिक्षावरील फोटोची खुण लक्षात असल्याने या दोघा तरुणांनी संपूर्ण गाव फिरून त्या रिक्षाचा शोध घेतला आणि सदर महिलेस बॅग परत मिळवून दिली. बॅग मिळाल्यावर महिलेने आपले आनंदाश्रू पाहून दोघे तरुण भारावले. त्यांनी महिलेने देवू केलेले बक्षीसही नाकारले. त्या महिलेने दोघा तरुणांना एरंडोल येथे बोलावले, त्या एरंडोलचे विद्यमान नगरसेवक योगेश महाजन यांच्या काकू होत्या. योगेश महाजन यांच्यासह संपुर्ण कुटूंबाने दोघा तरुणांचे आभार मानले. त्यांच्या या प्रामाणिक पणाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्यातील विजय रोकडे हे शिवसेनेचे पदाधिकारी व पत्रकार विनोद रोकडे यांचे लहान बंधू आहेत.