सूरत-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी सूरत येथील कोर्टाने खासदार राहूल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. तर लागलीच त्यांचा जामीन देखील देण्यात आला आहे.
२०१९च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांची कर्नाटकात १३ एप्रिल २०१९ रोजी कोलार येथे रॅली पार पडली. यावेळी राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली होती. नीरव मोदी, ललित मोदी, नरेंद्र मोदी यांचं आडनाव एक सारखं कसे? सर्व चोरांची आडनावे मोदी का असतात? असा सवाल राहुल गांधी यांनी केला होता. या विधानावरून भाजपचे आमदार पूर्णेश मोदी यांनी आक्षेप घेत सुरत कोर्टात मानहानीचा खटला दाखल केला होता. राहुल गांधी यांच्या या विधानामुळे मोदी समुदायाचा अपमान झाला आहे. त्यांच्या विधानामुळे मोदी समुदायातील लोकांना मान खाली घालावी लागत आहे, असं पूर्णेश मोदी यांनी म्हटलं होतं.
दरम्यान, या प्रकरणावर गेल्या शुक्रवारी सुनावणी पूर्ण झाली. त्यानंतर सुरत जिल्हा सत्र न्यायालयाने आज त्यावर निकाल दिला. या प्रकरणात कोर्टाने राहुल गांधी यांना दोषी ठरवून त्यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावली. मात्र लगेच राहुल गांधी यांना जामीनही मंजूर करण्यात आला. सुनावणीच्यावेळी राहुल गांधी स्वत: कोर्टात हजर होते.