पहूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पहूर पेठ परिसरातील सिध्दिविनायक गणपती मंदीराचा भंडाराचा कार्यक्रम आटोपून घरी परतणाऱ्या महिलेच्या गळ्यातील मंगलपोत तोडून पसार होणाऱ्या प्रयत्नात असलेल्या चाळीसगाव येथील दोन संशयित महिलांना नागरीकांच्या सतर्कतने रंगेहात पकडले आहे. याबाबत पहूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पहूर पेठ येथे शुक्रवारी सिद्धिविनायक गणपती मंदिरात सप्ताहाचा कार्यक्रमात भंडारा सुरू असताना या कार्यक्रमात चाळीसगाव येथील दोन ते तीन महिला कार्यक्रम ठिकाणी उपस्थित राहून किर्तन आटोपल्यानंतर महाप्रसादाला सुरुवात झाली. गावातील महिला महाप्रसाद घेतल्यानंतर घराकडे निघत असताना या दोन महिलांनी त्यांच्यासोबत साथीदार असलेले एका महिलेने येथील प्रगतिशील शेतकरी अशोक पंढरी पाटील हे आपल्या परिवारासह कीर्तनासाठी उपस्थित असतांना त्यांच्या मातोश्री गंगाबाई पंढरी पाटील काही महिलांसोबत घराकडे जात असताना गर्दीमध्ये अनोळखी महिलेने त्यांच्या गळ्यातील पाच तोळ्याची सोन्याची पोत तोडली. त्यातील काही सोन्याचे मणी त्यांच्या ब्लाऊजर पडल्याने त्यांच्या लक्षात आले त्यांनी मागे वळून बघितले असता अनोळखी महिला पाठीमागे पोत चोरत असल्याचे निदर्शनास आले. दोन्ही महिला घाई घाईत पळत असताना लक्षात आले आरओरड केली. त्या ठिकाणी उपस्थित भास्कर पांढरे, अमोल दौगे, अक्षय पाटील या तिघांनी या दोन्ही महिलांना रंगेहाथ पकडले. त्या महिलांपासून सोन्याची पोत हिसकावून घेतली ताबडतोब पोलिसांना याबाबत या घटनेची माहिती कळताच पोलिसांनी दोन्ही महिलांना ताब्यात घेतले. गंगाबाई पंढरी पाटील यांच्या फिर्यादीवरून राणी विजय कांबळे (वय-३६) आणि मालनबाई सुरेश कसबे (वय-५०) रा. चाळीसगाव जिल्हा जळगाव या दोन्ही महिलांनी विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रताप इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट अंमलदार रवींद्र देशमुख हे करीत आहे.