अमळनेर लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर शहरातील पिंपळे रोडवरील लामा जिनिंग परिसरात एका दुचाकीस्वाराच्या डोळ्यात मिरची पूड फेकून ५ लाख २७ हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची खळबळजनक घटना बुधवारी २५ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी सायंकाळी ६ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात तीन इसमांविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी यतिन विनोद कोठारी (वय ४८, रा. न्यू प्लॉट, अमळनेर) हे २५ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास आपल्या दुचाकी (क्र. एमएच १९ बीसी १४६५) पिंपळे रोडने जात होते. त्यांच्याकडे ५ लाख २७ हजार रुपयांची रोख रक्कम असलेली एक रेक्झीनची बॅग होती. ही बॅग त्यांनी मोपेड गाडीच्या पायाजवळ ठेवली होती.

त्यावेळी पाठीमागून एका मोटारसायकलवर आलेल्या तीन अज्ञात इसमांनी कोठारी यांची गाडी अडवली. काही समजण्याच्या आतच चोरट्यांनी त्यांच्या डोळ्यात तिखट मिरची पूड फेकली. डोळ्यांची आग होत असल्याचा फायदा घेत चोरट्यांनी गाडीवरील ५ लाख २७ हजारांची रोकड, जेवणाचा डबा आणि पाण्याची बाटली असलेली बॅग बळजबरीने ओढून नेली आणि घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते आणि पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शरद कोळी हे करीत आहे.



