यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | सध्या पावसाळा असून सुद्धा यावल नगरपालिका शहरातील नळधारकांना तीन दिवसाआड पाणीपुरवठा करीत आहे. नगरपालिकेच्या साठवण तलावात मुबलक पाणी साठा उपलब्ध असुन शहरवासीयांच्या मागणी नुसार पाणीपुरवठा दोन दिवसाआड करण्यात यावा अशी मागणी येथील माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांनी मुख्याधिकारी राहुल पाटील यांचेकडे केली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, यावल शहरात होत असलेला पाणी पुरवठा हा हतनूर धरणाच्या पटचारीतून होतो.नगरपालिकेने बांधलेल्या साठवण तलावात पाणी साठवण्यात येऊन जलशुद्धीकरण केंद्रात शुद्ध केलें जाते. जलशुद्धी केंद्रातून पाणी टाक्यांमध्ये जमा होऊन शहरातील नागरिकांना पाणी पुरवठा केला जातो.उन्हाळ्यामध्ये हतनूर धरणामध्ये पाणीसाठा कमी प्रमाणात असल्याने नियमित आवर्तन मिळण्यास उशीर होण्याची शक्यता गृहीत धरून शहरात होणारा पाणपुरवठा ऐन उन्हाळ्यात तीन दिवसाआड करण्यात आला होता. पाण्याचे दुर्भिक्ष लक्षात घेता शहरातील नागरिकांनी नगरपालिका यावल यांनी तिन दिवसाआड होणारा पाणपुरवठयास केलेल्या आवाहनास प्रतिसाद देऊन सहकार्य केले होते.
आता पावसाळा सुरू होऊन महिना झालेला असुन हतनूर धरण पूर्णपने भरलेले आहे. पाटबंधारे विभागाचे मार्फत धरणाचे दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग केला जात आहे. व नगरपालिकेच्या साठवण तलावात मुबलक प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध आहे. असे असून सुद्धा यावल नगरपरिषदकडून पाणीपुरवठा तिन दिवसाआड केला जातो आहे. शहरामध्ये बहुसंख्य नागरिकांकडे पाणीसाठा करण्याची साधने उपलब्ध नसल्यामुळे त्यांना पावसाळ्यात सुध्दा पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत आहे.शहरवासीयांची होत असलेली मागणी व गैरसोय लक्षात घेऊन तातडीने पाणीपुरवठा दोन दिवसाआड करण्यात यावा अशा मागणीचे पत्र माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांनी यावल नगर परिषदचे मुख्याधिकारी राहुल पाटील यांना दिले आहे.