दिपनगराजवळील रेल्वे उड्डाणपुलावर दोन ट्रकची समोरासमोर धडक

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ तालुक्यातील दिपनगर येथील रेल्वे उड्डाणपुलाजवळ दोन समोरासमोर ट्रकच्या झालेल्या धडकेत एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना रविवार ६ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री साडेबारा वाजता घडली. याप्रकरणी ७ ऑक्टोबर रोजी दुपारी २.३० वाजता भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात ट्रकवरील चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात अधिक माहिती अशी की, भुसावळ तालुक्यातील दिपनगर येथून गेलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील रेल्वे उड्डाणपुलावर वरणगावकडून भुसावळकडे जाणारा ट्रक क्रमांक (एमएच ४६ एफ १८) आणि भुसावळकडून मलकापूरकडे जाणारा ट्रक क्रमांक (जीजे १९ वाय ५२३४) यांची समोरासमोर धडक झाली. यामध्ये ट्रकमधील मधुकर भिकाजी वानखेडे रा. खामगाव जि.बुलढाणा येथील व्यक्ती गंभीर जखमी झाला. तर चालक गजानन नरहरी सरोदे वय-४७ राहणार नांदुरा जि.बुलढाणा हे किरकोळ जखमी झाले. दोघांना जवळच्या वरणगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी ट्रकचालक गजानन सरोदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ट्रक क्रमांक (जीजे १९ वाय ५२३४) वरील चालक अनिल पाल रा.उत्तर प्रदेश याच्या विरोधात भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संजय कंखरे करीत आहे.

Protected Content