श्रीनगर वृत्तसंस्था । जम्मू-काश्मिरच्या शोपिया परिसरातील एका घरात दडून बसलेल्या दोन दहशतवाद्यांना आज सकाळी ठार करण्यात आले आहे.
शोपिया परिसरातील एका घरात दहशतवादी दडून बसलेले असल्याची माहिती सुरक्षा यंत्रणांना मिळाली होती. यानुसार जवानांनी या घराला घेरले होते. घरात लपलेल्या दहशतवाद्यांनी गोळीबार करताच जवानांनीही याला जोरदार प्रत्युत्तर दिले. काही तासांपर्यंत चाललेल्या या चकमकीत दोन दहशवाद्यांना ठार करण्यात यश मिळाले आहे.
पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय जवानांनी अतिरेक्यांविरूध्द अतिशय आक्रमक पवित्रा घेतला आहे. यामुळे अतिरेक्यांना पळता भुई थोडी झाली आहे. काही दिवसांपूर्वीच कुलगाम येथे याच प्रकारे तीन दहशतवाद्यांना ठार करण्यात आले होते. यानंतर आज शोपियामध्ये दोन अतिरेक्यांना यमसदनी पाठविण्यात आले आहे.