जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । गावठी पिस्तूल व जीवंत काडतूस घेवून दहशत माजविणाऱ्या दोन संशयित आरोपींना वरणगाव येथील फुलगाव फाट्याजवळ गुरूवारी ४ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजता जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करत अटक केली आहे. त्यांच्याकडून गावठी पिस्तूल, दोन जीवंत काडतूस, दोन मोबाईल आणि गुन्ह्यात वापरलेले दुचाकी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबाबत रात्री ९ वाजता वरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चरणसिंग उखा चव्हाण (वय ३६, रा. चौडी, बऱ्हाणपूर, मध्य प्रदेश) आणि पंकज रतनसिंग चव्हाण (वय २५, रा. मोरझिरा, मुक्ताईनगर, जळगाव) असे अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.

जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना ४ सप्टेंबर रोजी गुप्त माहिती मिळाली की, चरणसिंग चव्हाण आणि पंकज चव्हाण हे दोन संशयित वरणगाव येथील फुलगाव पुलाखाली येणार आहेत. त्यांच्याकडे गावठी कट्टा असून ते दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने येत आहेत, असे कळले. मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही आरोपी दुचाकी (क्रमांक एमपी-68-झेडसी-3357) वर येणार होते. त्यानुसार पोलीसांनी रात्री ८ वाजता फुलगाव फाट्याजवळ सापळा रचला आणि दोघांना अटक केली.

त्यांची चौकशी केली असता त्यांनी आपली नावे चरणसिंग उखा चव्हाण (वय ३६, रा. चौडी, बऱ्हाणपूर, मध्य प्रदेश) आणि पंकज रतनसिंग चव्हाण (वय २५, रा. मोरझिरा, मुक्ताईनगर, जळगाव) अशी सांगितली. त्यांच्याकडून एक गावठी पिस्तूल, दोन जिवंत काडतुसे, मोटारसायकल आणि दोन मोबाईल असा एकूण १ लाख २९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.



