जळगाव, प्रतिनिधी । जळगाव आणि नशिराबाद परिसरातून चोरीच्या दुचाकींची विक्री करणाऱ्या दोन भामट्यांना आज शनिवारी दुपारी १ वाजता स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. दोघांकडून तीन चोरीच्या दुचाक्या हस्तगत केल्या आहे. दोघांना पुढील कारवाईसाठी जिल्हा पेठ पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सविस्तर माहिती अशी की, नशिराबाद आणि जिल्हा पेठ हद्दतील दुचाकींची चोरी करून दोन संशयित आरोपी तालुक्यातील आसोदा गावात चोरीची दुचाकी विक्रीसाठी फिरत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी पोहेकॉ प्रदीप पाटील, जयंत चौधरी, सुनिल दामोदरे, पो.ना. विजय पाटील, पंकज शिंद यांनी तालुक्यातील आसोदा येथील संशयित आरोपी देवानंद लिलाधर भालेरा (वय-२२) व समाधान राजू सोनवणे (वय-२२) रा. धनजी नगर आसोदा ता.जि.जळगाव यांना सापळा रचून अटक केली आहे. पोलीसांनी ही कारवाई आज शनिवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास केली आहे. दोघांकडून चोरीच्या ६० हजार रूपये किंमतीच्या तीन दुचाकी हस्तगत केल्या. दोघांकडून कसून चौकशी सुरू असून अजून काही गुन्हे उघडकीला येण्याची शक्यता असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी दिले आहे. पुढील कारवाईसाठी दोन्ही संशयित आरोपींना जिल्हा पेठ पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.