जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यासह पाचोरा तालुक्यातील विविध भागातून दुचाकींची चोरी करणाऱ्या दोन संशयित आरोपींना छत्रपती शिवाजी महाराज चौकातून चोरीच्या १५ दुचाकींसह पाचोरा पोलिसांनी अटक केल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी सोमवारी दुपारी १ वाजता दिलेल्या पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे.
या संदर्भात अधिक माहिती अशी की, पाचोरा पोलीस ठाण्याच्या हद्दीसह इतर भागातून विविध प्रकारच्या चोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले होते. या संदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी गुन्हे उघड करण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्यानुसार पाचोरा उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय येरूळे यांच्या सूचनेनुसार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक पवार यांना पाचोरा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात दुचाकी चोरीतील संशयित आरोपी हे दुचाकीवर फिरत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने कारवाई करत संशयित आरोपी विशाल पांडुरंग पाटील वय-२६, रा. गजानन नगर, पाचोरा आणि रवींद्र बाबुराव पाटील वय-२९ रा. गोंडगाव तालुका भडगाव या दोघांना चोरीची दुचाकी क्रमांक (एमएच १९ डीई १८१०) सह पाचोरा पोलीसांनी अटक केली आहे.त्यांची अधिक चौकशी केली असता त्यांनी इतर चोरीच्या १४ अश्या एकुण चोरीच्या १५ दुचाकी काढून दिल्या आहेत. ही कारवाई पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोकॉ राहुल शिंपी, रणजीत पाटील, श्यामकांत पाटील, योगेश पाटील, विनोद बेलदार, सचिन पवार, हरीश अहिरे आणि सुनील पाटील यांनी केली आहे.