भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू

पुणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | पुण्यातील खराडी येथे एका भरधाव ट्रकने एका दुचाकीस्वाराला जोरात धडक दिली असून या घटनेत दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. ही घटना सोमवारी रात्री १०.३० च्या सुमारास घडली. पुण्यातील खराडीत मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते. यात ट्रक चालकांची संख्या मोठी असते. यातील एका भरधाव वेगात असलेल्या ट्रकने काल रात्री झालेल्या विचित्र अपघातात दोघांचा नाहक बळी घेतला आहे.

अधिक माहितीनुसार वृत्त असे की, आदिल शेख व पाहद शेख अशी ट्रकने दीलेल्या धडकेत मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत. हे विद्यार्थी रायसोनी कॉलेजचे विद्यार्थी आहेत. यातील आदिलचा जागीच मृत्यू झाला तर तर पाहदचा मृत्यू ससून रुग्णालयात उपचार सुरू असतांना झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नगर रस्त्यावरील जकातनाका येथे ही घटना घडली. आदिल आणि पाहद हे त्याचा मित्र अफांन शेख यांना गावी जायचे असल्याने त्याला सोडण्यासाठी ते पुणे स्टेशनला जात होते. यावेळी नगर रस्त्यावरील जकात नाका येथे एका भरधाव ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक ऐवढी जोरदार होती की दुचाकी ही ८०० मीटर फरफटत गेली. दरम्यान, ट्रक चालकाने मद्य प्राशन केल्याचे देखील उघड झाले आहे.

Protected Content