जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । लग्नकार्यातील आनंदाच्या वातावरणात एका क्षुल्लक वादावरून दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एरंडोल तालुक्यातील हनुमंत खेडे येथील मराठी शाळेच्या आवारात ही घटना मंगळवारी २४ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजता घडली असून, जुन्या वादाचा राग मनात धरून एका तरुणावर चाकूने प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. या प्रकरणी कासोदा पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, अरूण भिला पाटील (वय ४२ रा. बोरखेडा ता. चाळीसगाव) हे एका लग्नसमारंभासाठी जळगाव तालुक्यातील हनुमंत खेडे येथे आले हाते. लग्नातील बँडची गाडी पुढे घेण्याच्या कारणावरून आरोपी आणि फिर्यादी यांच्यात काही वेळापूर्वी वाद झाला होता. याच वादाचा राग मनात धरून आरोपी संदीप धोंडू बेडसे (पाटील), महेश प्रकाश बेडसे आणि गोरख विजय पाटील यांनी फिर्यादीला गाठले.

चाकूने केला वार :
रागाच्या भरात असलेल्या संशयित आरोपींनी अरुण पाटील आणि विनय विकास उर्फ भैय्यासाहेब पाटील यांच्यावर हल्ला चढवला. यावेळी मुख्य संशयित आरोपी संदीप बेडसे याने अरुण पाटील यांच्या पोटात चाकू खुपसून त्यांना गंभीर जखमी केले, तर विनय पाटील यांच्या डाव्या पायावर वार करून त्यांना देखील जखमी केले. इतर दोन आरोपींनी फिर्यादीला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली.
पोलीस कारवाई :
घटनेची माहिती मिळताच कासोदा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी श्रीकांत अंकुशराव पाटील आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकूरवाड यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवत संशयित आरोपी महेश प्रकाश बेडसे आणि गोरख विजय पाटील यांना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस कर्मचारी हे करीत आहे.



