रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रावेर तालुक्यात अवैध गौण खनिज माफियांनी कायद्याचा धाक झुगारून लावत चक्क तहसील कार्यालयाच्या आवारातून जप्त केलेली दोन ट्रॅक्टर दिवसाढवळ्या पळवून नेल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या घटनेमुळे शासकीय सुरक्षिततेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या धाडसी चोरीप्रकरणी रावेर पोलिसांत चालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अवैध गौण खनिज वाहतुकीला आळा घालण्यासाठी मंडळ अधिकारी अनंता खवले आणि तलाठी महेंद्र चौधरी यांचे पथक निंभोरा ते वाघोदा रस्त्यावर गस्त घालत होते. यावेळी दसनुर फाट्याजवळ अवैधरित्या वाळू घेऊन जाणारी दोन ट्रॅक्टर (क्रमांक: एमएच १९ एएन ४४५२ आणि एमएच १९ पी ३४४०) महसूल पथकाने पकडली. ही दोन्ही ट्रॅक्टर जप्त करून कारवाईसाठी रावेर तहसील कार्यालयाच्या सुरक्षित आवारात उभी करण्यात आली होती.

कारवाईची प्रक्रिया सुरू असतानाच, संधी साधून ट्रॅक्टर चालक संदीप कोळी आणि महेंद्र तायडे (दोघे रा. सिंगनुर) यांनी तहसील कार्यालयाच्या आवारातून दोन्ही ट्रॅक्टर वेगाने पळवून नेले. अंदाजे ३ लाख ३५ हजार रुपये किमतीचा हा मुद्देमाल पळवून नेल्याने महसूल अधिकारी अवाक झाले.
रावेर तालुक्यातून वाहणाऱ्या तीन महत्त्वाच्या नद्यांमधून मोठ्या प्रमाणात अवैध उत्खनन सुरू असल्याच्या तक्रारी वारंवार होत आहेत. महसूल विभागाचे अधिकारी अनेकदा जीव मुठीत धरून कारवाईसाठी जातात, मात्र वाळू माफियांकडून त्यांचा पाठलाग करणे किंवा त्यांच्यावर दबाव आणण्याचे प्रकार वाढले आहेत. “प्रशासनाची भीती उरली नाही का?” असा सवाल आता नागरिक विचारत आहेत.
रावेर तालुक्यातील ही गंभीर परिस्थिती पाहता, जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करावा आणि वाळू माफियांवर कठोर ‘मोक्का’ किंवा तडीपारीची कारवाई करावी, अशी मागणी पर्यावरणप्रेमींनी केली आहे. सध्या पोलिसांनी संशयित आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना केली आहे.



