Home क्राईम भुसावळातील साकरी गावात दोन शाळकरी मुलींची हत्या

भुसावळातील साकरी गावात दोन शाळकरी मुलींची हत्या


भुसावळ-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भुसावळ तालुक्यातील साकरी गावात दोन अल्पवयीन शाळकरी मुलींची विहिरीत ढकलून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून, संपूर्ण तालुक्यात संताप आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या दुर्दैवी घटनेमुळे जळगाव जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, दोन्ही मुली गावातीलच रहिवासी असून त्या शाळेत शिक्षण घेत होत्या. आज सकाळी शाळेत जाण्याच्या वेळेत गावाजवळील एका विहिरीत ही घटना घडली. अज्ञात कारणातून दोघींना विहिरीत ढकलून हत्या करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

घटनेची माहिती मिळताच गावात मोठी गर्दी जमली. संतप्त ग्रामस्थांनी संशयित आरोपी रोहन नरेंद्र चौधरी याच्यावर गंभीर आरोप करत त्याला तात्काळ कठोर शिक्षा देण्याची मागणी केली. पोलिसांनी त्याला भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात ताब्यात घेतले असताना काही ग्रामस्थांनी त्याला पोलिसांच्या ताब्यातून सोडवून घेण्याचा प्रयत्न केल्याचे समजते. यामुळे काही काळ तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला आहे.

दरम्यान, जळगाव जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी भेट देत तपासाची सूत्रे हाती घेतली आहेत. घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला आहे. मात्र, मृतदेह ताब्यात घेण्यास झालेल्या विलंबामुळे ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. मुलींचे मृतदेह लवकरात लवकर ताब्यात देऊन अंत्यसंस्कार करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

पोलिसांकडून संशयित आरोपीची सखोल चौकशी सुरू असून, हत्या नेमकी का आणि कशा पद्धतीने करण्यात आली याचा तपास सुरू आहे. अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नसली तरी या घटनेने साकरीसह परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. पालकवर्गामध्येही मोठी चिंता व्यक्त होत आहे. पोलीस प्रशासनाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आणि कायदा हातात न घेण्याचे आवाहन केले आहे. पुढील तपास सुरू आहे.


Protected Content

Play sound