Home Cities अमळनेर पोलिसांची मोठी कारवाई: दोन पिस्टल, सहा जिवंत काडतुसे जप्त; दोघांना अटक

पोलिसांची मोठी कारवाई: दोन पिस्टल, सहा जिवंत काडतुसे जप्त; दोघांना अटक

0
196

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर शहरात गावठी बनावटीचे पिस्टल विकण्यासाठी आलेल्या दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी त्यांच्याकडून दोन गावठी बनावटीचे पिस्टल, सहा जिवंत काडतुसे आणि दोन दुचाकी असा एकूण १ लाख ६६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे अवैध शस्त्रांचा व्यापार करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुप्त माहितीमुळे कारवाईला यश
पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम यांना २८ ऑगस्ट रोजी गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, चोपडा रोडवर एक व्यक्ती गावठी बनावटीचे पिस्टल विक्री करण्यासाठी येणार आहे. या माहितीच्या आधारे निकम यांनी तात्काळ गुन्हे अन्वेषण पथकातील पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर, हवालदार मिलिंद सोनार, पोलीस शिपाई उदय बोरसे आणि निलेश मोरे यांच्यासोबत सापळा रचला. खाजगी वाहनातून पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले. संत आसाराम बापू आश्रमासमोर दोन संशयित व्यक्ती उभे असताना पोलिसांना पाहून पळून जाऊ लागले. मात्र पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून त्यांना मोठ्या शिताफीने पकडले.

आरोपींची ओळख पटली, गुन्हा दाखल
पोलिसांनी पकडलेल्या दोन आरोपींची चौकशी केली असता त्यांनी आपली नावे विशाल भैय्या सोनवणे (वय १८, रा. ढेकुसिम, ता. अमळनेर) आणि गोपाल भिमा भिल (वय ३०, रा. सत्रासेन, ता. चोपडा) अशी सांगितली. त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे दोन गावठी बनावटीचे पिस्टल आणि सहा जिवंत काडतुसे मिळून आली. त्यांच्याकडे परवाना नसल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. या प्रकरणी पोलीस शिपाई विनोद संदानशिव यांनी सरकारतर्फे फिर्याद दाखल केली असून, आरोपींविरोधात अमळनेर पोलीस ठाण्यात शस्त्र अधिनियम कलम ३, २५ आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १३५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गणेशोत्सव आणि ईदच्या पार्श्वभूमीवर विशेष खबरदारी
सध्या सुरू असलेल्या गणेशोत्सव आणि आगामी ईद-ए-मिलादच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी, जळगाव यांनी जिल्ह्यात तलवारी, अग्नीशस्त्रे आणि प्राणघातक शस्त्रे बाळगण्यास प्रतिबंध केला आहे. या अनुषंगाने अमळनेर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणत्याही व्यक्तीकडे बेकायदेशीर शस्त्रे असल्यास त्याची माहिती पोलिसांना द्यावी. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर करत आहेत.


Protected Content

Play sound