Home क्राईम बसस्थानक आवारातून दोघांचे महागडे मोबाईल लांबविले !

बसस्थानक आवारातून दोघांचे महागडे मोबाईल लांबविले !


भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन मोबाईल लांबवणाऱ्या एका अट्टल चोरट्याला भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी तातडीने कारवाई करत अटक केली आहे. या घटनेत दोन तरुणांचे एकूण ४२ हजार रुपये किमतीचे महागडे मोबाईल चोरीला गेले होते. ही घटना गुरुवारी, १२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, योगेश समाधान वराडे (रा. टाकळी, ता. जामनेर) हा तरुण आपल्या मित्रासह गुरुवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास भुसावळ बसस्थानकावर आला होता. यावेळी बसमध्ये चढताना किंवा गर्दीत उभे असताना, संशयित आरोपी तनवीर शेख रहीम शेख (रा. गेंदालाल मिल, जळगाव) याने नजर चुकवून योगेश आणि त्याच्या मित्राचे खिशातील दोन महागडे मोबाईल अत्यंत शिताफीने लांबवले.

मोबाईल चोरीला गेल्याचे लक्षात येताच दोन्ही तरुणांनी तात्काळ भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन गाठले आणि तक्रार नोंदवली. प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न लक्षात घेता, पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवली. योगेश वराडे याने दिलेल्या फिर्यादीवरून रात्री ९ वाजता संशयित आरोपी तनवीर शेख याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल कांतीलाल केदार हे अधिक सखोलपणे करत आहेत.


Protected Content

Play sound