ठाणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | कल्याण- नगर महामार्गावरील माळशेज घाटात रिक्षावर दरड कोसळल्याची घटना घडली. या घटनेत दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, तीन जण जखमी झाले. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेत चुलता- पुतण्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.
राहुल भालेराव आणि त्याचा पुतण्या स्वयं अशी मृतांची नावे आहेत. भालेराव कुटुंब मुंबईच्या मुलुंड येथील रहिवाशी असून ते रिक्षाने अहमदनगर जिल्ह्यातील चंदनापूर येथे मूळ गावी जात होते. मात्र, घाटावरून जात असताना त्यांच्या रिक्षावर दरड कोसळली. राहुल आणि स्वयंसह घरातील एकूण पाच जण ढिगाऱ्याखाली अडकली. मात्र, तिघांनी प्रसंगावधान दाखवत स्वत:चे प्राण वाचवले. पण राहुल आणि स्वयं यांना ढिगाऱ्यातून बाहेर निघता आले नाही आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच टोकावडे पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. जखमींना जवळच्या शासकीय रुग्णालयामध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आले.
महाराष्ट्रात नुकतेच मोसमी पावसाचे आगमन झाले. मागील काही दिवसांपासून माळशेज घाटासह आजुबाजूच्या परिसरात पाऊस सुरू आहे. मात्र, या पावसामुळे घाटातील कपाऱ्यांमध्ये पाणी जाऊन डोंगरावरील कोसळून अपघात घडत असतात. कल्याणवरुन अहमदनगरच्या दिशेने जाण्यासाठी माळशेज घाटातून जाणारा हा एकमेव मार्ग आहे. पावसाळ्यामध्ये या घाटातून प्रवाशांना जीव मुठीत धरुन प्रवास करावा लागतो.