चोपडा लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या पथकाने लासूर शिवारात धडक कारवाई करत विनापरवाना गावठी कट्टा बाळगणाऱ्या दोन तरुणांना ताब्यात घेतले आहे. या कारवाईत पोलिसांनी २५ हजार रुपये किमतीचे पिस्तुल आणि अडीच लाख रुपये किमतीची हुंदाई कार, असा एकूण २ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. हे दोन्ही संशयित आरोपी नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील रहिवासी आहेत.

चोपडा ग्रामीण पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली होती की, लासूर ते सत्रासेन उमटी रोडवरील ‘फौजी ढाब्या’जवळ एका पांढऱ्या रंगाच्या कारमधून प्राणघातक शस्त्र नेले जात आहे. त्यानुसार पोलिसांनी तातडीने सापळा रचला. शुक्रवारी, २ जानेवारी २०२६ रोजी संध्याकाळी ५:२५ वाजेच्या सुमारास संशयास्पद वाटणाऱ्या हुंदाई कंपनीच्या कारला (क्रमांक MH 48 F 4104) अडवून तिची झडती घेतली असता, त्यात एक लोखंडी धातूचा गावठी बनावटीचा कट्टा (मॅगझीनसह) मिळून आला.

या प्रकरणी पोलिसांनी देविदास अभिमन पगार (वय १८, रा. मुगसे, ता. मालेगाव) आणि मयुर संतोष निकम (वय २३, रा. पाटणे, ता. मालेगाव, जि. नाशिक) या दोघांना ताब्यात घेतले आहे. दोघांकडून गावठी कट्टा हस्तगत करण्यात आला आहे. याप्रकरणी चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार नसिर बशीर तडवी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोघांवर चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शेषराव नितनवरे हे करत आहे.



