Home क्राईम रावेर तालुक्यात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये विष प्राशनाने दोघांचा मृत्यू 

रावेर तालुक्यात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये विष प्राशनाने दोघांचा मृत्यू 

0
215

रावेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।  रावेर तालुक्यातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन नागरिकांनी विषारी औषध प्राशन करून आपली जीवनयात्रा संपवली आहे. यातील एका घटनेत मृत व्यक्ती कर्जबाजारी शेतकरी असल्याचे स्पष्ट झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या घटनांमुळे शेतकरी आत्महत्यांचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीरपणे समोर आला आहे.

पहिली घटना कुसुंबा गावातील असून, येथील रहिवासी रविंद्र भीमसीग पाटील (वय ६०) यांनी गुरुवारी कीटकनाशक प्राशन केले. त्यांच्या कुटुंबीयांनी आणि ग्रामस्थांनी तातडीने त्यांना उपचारासाठी मध्य प्रदेशातील बुऱ्हाणपूर येथील रुग्णालयात हलवले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची नोंद झिरो नंबरने रावेर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून करण्यात आली आहे. रविंद्र पाटील हे काही काळापासून आर्थिक अडचणीत असून, त्यांच्यावर कर्जाचे ओझे असल्याची माहिती समोर आली आहे.

दुसरी घटना भोर गावातील असून, येथील शेतकरी मोहन लक्ष्मण गायकवाड (वय ५५) यांनीही विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. त्यांच्या मृत्यूची नोंद रावेर पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यू म्हणून करण्यात आली आहे. गायकवाड कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावात शोककळा पसरली आहे.

या दोन्ही घटनांनी तालुक्यातील नागरिकांना हादरून टाकले असून, शेतकऱ्यांवरील वाढते आर्थिक ताण, कर्जबाजारीपणा आणि आत्महत्येच्या घटना ही गंभीर सामाजिक समस्या बनली आहे. स्थानिक प्रशासनाने या प्रकरणांकडे गांभीर्याने लक्ष देत मदतीचे उपाययोजनांचे आश्वासन द्यावे, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.

या सलग दोन आत्महत्या तालुक्याच्या दैनंदिन जीवनात काळी छाया टाकून गेल्या. विशेषतः कर्जाच्या विळख्यात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या वेदना अधिकच ठळकपणे समोर येत आहेत.


Protected Content

Play sound