जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील कानळदा येथे एक आगळावेगळा विवाह सोहळा पार पडला. आज दि. १ डिसेंबर जागतिक एड्स दिनाचे औचित्य साधून २ एचआयव्हीग्रस्त जोडप्यांचा विवाह पार पडला आहे.
सेवानिवृत्त पोलिस उपअधीक्षक पुंडलिक सपकाळे यांनी या आगळ्यावेगळ्या लग्न सोहळ्याचे आयोजन केले होते. याआधी अशा प्रकारे एचआयव्ही पॉझिटिव्ह जोडप्यांचे २१ लग्न त्यांनी लावून दिले आहेत. संपूर्ण कानळदा गावातून दोन्ही नवरदेव मुलांची बैलगाडीवर वाजत-गाजत वरात काढण्यात आली. या वरातीत संपूर्ण गाव आनंदाने सहभागी झाले होते. १९९२ साली स्वर्गीय हेमंत करकरे यांच्यासोबत चंद्रपूर येथे काम करतांना समाजसेवेचा वसा हाती घेतला असे यावेळी बोलताना पुंडलिक सपकाळे म्हणाले. शेवटच्या श्वासापर्यंत हे कार्य सुरू ठेवेल असा निर्धार यावेळी त्यांनी बोलून दाखवला. सामाजिक कार्यकर्त्या शमीभा आणि जळगावचे आमदार राजूमामा भोळे यांनीसुद्धा आपले विचार यावेळेस मांडले. या सामाजिक सोहळ्यासाठी बँड, मंडप तसेच जेवणाची व्यवस्था वेगवेगळ्या नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने मोफत उपलब्ध करून दिली. वेगळ्या पद्धतीचे सामाजिक काम उभारल्या बद्दल पुंडलिक सपकाळे यांचा यावेळेला सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.