जळगाव प्रतिनिधी । जळगाव शहरातील खंडेराव नगरात पैसे देण्यावरून आणि घर खाली करून देण्याच्या कारणावरून दोन गटात हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात परस्पर विरोधात तक्रार देण्यात आली आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, “पहिल्या गटातील रविंद्र हरी मोरे (वय 32) रा. शिरसोली ता. जळगाव यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, शुक्रवार, दि. २१ जानेवारी रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास खंडेराव नगरातील नसरीन खान आणि अज्जू खान यांनी पैसे देण्यावरून आणि घर खाली करण्याच्या कारणावरून रवींद्र मोरे यांना शिवीगाळ करून त्यांनी मारहाण केली. तर ज्यांना घर विकले आहे. लाला नागो कुंभार आणि रूपा नागो कुंभार यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात नसरीन खान व अज्जू खान यांचे विरोधात तक्रार देण्यात आली आहे.
तर नसरिनबी नसिर खान (वय 32) रा. खंडेराव नगर यांनी दिलेल्या दुसऱ्या तक्रारीत म्हटले आहे की, घर खाली करून पैसे देण्यावरून सपना हरी मोरे, रविंद्र हरी मोरे दोन्ही रा. रायसोनी कॉलेज मागे शिरसोली आणि रूपा कुमार कुंभार आणि लाला नागो कुंभार दोन्ही रा. खंडेराव नगर, जळगाव यांनी शिवीगाळ करून त्यांनी मारहाण केली तर जीवे ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात चौघांविरोधात तक्रार देण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस नाईक जितेंद्र तावडे करीत आहे.