रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रावेर तालुक्यातील खिरोदा प्र. यावल येथे सांडपाण्याच्या पाईपवरून झालेल्या वादाचे रूपांतर भीषण हाणामारीत झाले आहे. घरासमोर सांडपाण्याचा पाईप काढल्याच्या कारणावरून पाच जणांनी मिळून एका कुटुंबाला लोखंडी रॉड आणि काठीने बेदम मारहाण केली. या घटनेत घराची तोडफोड करण्यात आली असून, “तलवारीने कापून टाकू” अशी धमकी दिल्याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

भूषण प्रकाश मोपारी (वय १८, रा. खिरोदा) यांच्या घरासमोर आरोपी समाधान रामदास पाटकर याने आपल्या घराच्या सांडपाण्याचा पाईप काढला होता. या पाईपाबाबत विचारणा करण्यासाठी भूषण गेले असता, त्याचा राग धरून आरोपींनी वाद उकरून काढला. २० जानेवारी रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास हा वाद विकोपाला गेला. आरोपी समाधान पाटकर याने भूषण मोपारी यांच्या डोक्यात मागील बाजूस लोखंडी रॉडने वार करून गंभीर दुखापत केली. यावेळी भांडण सोडवण्यासाठी आलेले उखडू नारायण मोपारी यांना आरोपी अर्जुन पाटकर याने रॉडने कपाळावर मारून जखमी केले. तर, साक्षीदार दुर्गा मोपारी यांना आरोपी विमल पाटकर याने काठीने हाताच्या दंडावर मारहाण केली. आरोपींनी एवढ्यावरच न थांबता, “तुम्हाला तलवारीने कापून टाकू” अशी धमकी देत भूषण यांच्या घराच्या खिडक्यांवर दगडफेक करून काचा फोडल्या.

पोलीस कारवाई याप्रकरणी भूषण मोपारी यांनी दिलेल्या तक्रारीवरून रावेर पोलीस ठाण्यात समाधान रामदास पाटकर, अर्जुन रामदास पाटकर, विमल समाधान पाटकर, तुषार रामदास पाटकर आणि शुभम रामदास पाटकर (सर्व रा. खिरोदा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार सिकंदर तडवी या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.



