धनाजी नाना महाविद्यालयात प्राध्यापकांसाठी दोन दिवसीय कार्यशाळा

फैजपूर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । धनाजी नाना महाविद्यालयात प्राध्यापकांच्या क्षमता बळकटीकरणासाठी दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव व प्रधानमंत्री उच्चत्तर शिक्षा अभियान (पीएम-उषा) अंतर्गत ‘कॅपॅसिटी बिल्डिंग ऑफ टीचर्स’ या विषयावर ही कार्यशाळा पार पडली. उद्घाटन समारंभात डॉ. कपिल सिंघेल, सहसंचालक, उच्च शिक्षण विभाग, जळगाव यांनी ऑनलाइन उपस्थित राहून कार्यशाळेला शुभेच्छा दिल्या आणि शिक्षकांच्या भूमिकेचे महत्त्व विशद केले.

कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी तापी परिसर विद्या मंडळाचे सहसचिव प्रा. नंदकुमार भंगाळे अध्यक्षस्थानी होते. यावेळी व्यवस्थापन मंडळ सदस्य माजी प्राचार्य डॉ. जी. पी. पाटील, संजय चौधरी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र वाघुळदे, उपप्राचार्य प्रा. डॉ. एस. व्ही. जाधव, उपप्राचार्य प्रा. डॉ. हरीश नेमाडे, उपप्राचार्य प्रा. डॉ. कल्पना पाटील तसेच विविध महाविद्यालयांचे प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्राचार्य डॉ. राजेंद्र वाघुळदे यांनी कार्यशाळेचे प्रास्ताविक करताना शिक्षकांच्या अद्ययावत ज्ञानाची गरज अधोरेखित केली. त्यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या युगात शिक्षकांनी स्वतःच्या कौशल्यांची सतत वाढ करावी असे मत व्यक्त केले. उद्घाटन समारंभात कर्मयोगी धनाजी नाना चौधरी आणि स्व. बाळासाहेब मधुकरराव चौधरी यांच्या प्रतिमांना माल्यार्पण व दीपप्रज्वलन करून कार्यशाळेचा शुभारंभ करण्यात आला.

कार्यशाळेत विविध तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. प्रा. डॉ. योगेश चौधरी यांनी ‘एलएमएस सिस्टीम’, प्रा. डॉ. भूपेंद्र केसुर यांनी ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 फायदे व आव्हाने’, प्रा. डॉ. जी. आर. वाणी यांनी ‘स्टॅटिस्टिकल टूल्स इन रिसर्च’ आणि प्राचार्य डॉ. सी. पी. लभाने यांनी ‘कॅपॅसिटी बिल्डिंग ऑफ टीचर्स थ्रू सायकॉलॉजी’ या विषयांवर विचार मांडले.

कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी तापी परिसर विद्या मंडळाचे अध्यक्ष शिरीषदादा चौधरी, प्राचार्य डॉ. राजेंद्र वाघुळदे, उपप्राचार्य, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली. या कार्यशाळेत अनेक महाविद्यालयांतील शिक्षकांनी सहभाग नोंदवून आपले ज्ञान समृद्ध केले.

Protected Content