मुंबई – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने आपल्या नविन नियुक्त पदाधिकाऱ्यांची यादी जाहीर केल्यानंतर आता पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी पुढचे पाऊल उचलले आहे. याचाच एक भाग म्हणून पुण्यातील खडकवासला येथे ११ आणि १२ ऑगस्ट २०२५ रोजी दोन दिवसीय निवासी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेत काँग्रेसच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांसह राज्यातील सर्व महत्त्वाचे नेते सहभागी होणार असून, ही कार्यशाळा काँग्रेसच्या आगामी रणनितीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.
पुण्यातील खडकवासला येथील सोरिना हिल रिसॉर्ट येथे होणाऱ्या या निवासी कार्यशाळेत पक्षाची धोरणे, संघटनात्मक बांधणी, आगामी निवडणुकांच्या तयारीसाठीचे दिशानिर्देश आणि कार्यपद्धती याबाबत सखोल मार्गदर्शन व चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. १० ऑगस्ट रोजी संध्याकाळी ६ वाजल्यापासून या कार्यशाळेसाठी निमंत्रित पदाधिकाऱ्यांची नोंदणी सुरू होईल. दुसऱ्या दिवशी, ११ ऑगस्ट रोजी सकाळी ७ वाजता सामुदायिक प्रार्थनेने शिबिराची सुरुवात होणार असून त्यानंतर सकाळी १० वाजता या कार्यशाळेचे औपचारिक उद्घाटन होईल.

या उद्घाटन कार्यक्रमात काँग्रेस प्रदेश प्रभारी रमेश चेन्नीथला, नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विधानसभेतील काँग्रेस गटनेते विजय वडेट्टीवार, विधान परिषदेतील गटनेते सतेज ऊर्फ बंटी पाटील, काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य आणि ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्यासह काँग्रेसचे इतर वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत. कार्यशाळेदरम्यान पक्षातील विविध समित्यांचे समन्वय, जिल्हानिहाय कार्ययोजना, युवक आणि महिला कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण, सोशल मीडिया प्रचार यासारख्या महत्त्वाच्या विषयांवर विशेष सत्रांचे आयोजन केले जाईल.
या दोन दिवसीय कार्यक्रमात काँग्रेसच्या राजकीय व्यवहार समितीची विशेष बैठकही होणार आहे, ज्यात आगामी निवडणुकांसाठीच्या रणनीतीचा आराखडा तयार केला जाण्याची शक्यता आहे. कार्यशाळेची सांगता १२ ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजता प्रदेश प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या मार्गदर्शनपर भाषणाने होणार आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष (संघटन व प्रशासन) अॅड. गणेश पाटील यांनी ही माहिती दिली आहे.



