जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । बदली झालेल्या ठिकाणी कार्यमुक्त करण्यासाठी १ लाख ८० हजारांची लाच स्विकारणाऱ्या जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागातील वरिष्ठ लिपीक नरेंद्र किशोर खाचणे (वय ५२) रा. अयोध्या नगर, जळगाव याला जळगाव एसीबीने बुधवारी २१ ऑगस्ट रोजी सायंकाळी अटक केली होती. गुरूवारी २२ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता जळगाव जिल्हा न्यायालयाचे न्यायमूती जे.जे. मोहिते यांनी दोन दिवस २४ ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार हे लोकसेवक असून ते यावल येथील सावखेडा सिम प्राथमिक आरोग्य केंद्रात शिपाई पदावर कार्यरत आहे. त्यांची स्थापत्य अभियांत्रीकी सहाय्यक पदावर रावेर पंचायत समिती येथे बदली झाली होती. बदली ठिकाणी कार्यमुक्त करण्यासाठी यातील लोकसेवक वरीष्ठ लिपीक नरेंद्र खाचणे यांनी २ लाख रुपयांची मागणी केली होती. याबाबतची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली होती. त्यानुसार सापळा रचून बुधवार २१ रोजी सायंकाळी ६ वाजता जळगाव लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून तडजोडीअंती तक्रादाराकडून १ लाख ८० हजार रुपयांची लाच स्विकारतांना रंगेहाथ पकडले. याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, संशयित आरोपी नरेंद्र खाचणे याला गुरूवारी २२ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता जिल्हा न्यायालयातील न्यायमुर्ती जे.जे. मोहिते यांच्या न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने २४ ऑगस्टपर्यंत दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक अमोल वालझाडे हे करीत आहे.