Home Cities जळगाव शिवजयंतीनिमित्त दोन दिवसीय जिल्हास्तरीय कार्यक्रमांचे आयोजन

शिवजयंतीनिमित्त दोन दिवसीय जिल्हास्तरीय कार्यक्रमांचे आयोजन


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती जळगाव जिल्ह्यात यंदा अत्यंत उत्साहात, शिस्तबद्ध आणि प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली १८ व १९ फेब्रुवारी रोजी दोन दिवसीय जिल्हास्तरीय भव्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, यामध्ये सांस्कृतिक, शैक्षणिक तसेच स्पर्धात्मक उपक्रमांचा समावेश असणार आहे.

या संदर्भात आयोजित आढावा बैठकीत बोलताना जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी सांगितले की, शिवजयंतीच्या निमित्ताने विद्यार्थ्यांपासून नागरिकांपर्यंत सर्व घटकांना छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार, शौर्य, नेतृत्वगुण आणि राष्ट्रभक्ती यांची ओळख व्हावी, या उद्देशाने कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने हा उत्सव व्यापक स्वरूपात साजरा केला जाणार आहे.

कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी सकाळी प्रभात फेरीचे आयोजन करण्यात येणार असून त्यानंतर किल्ले बनविण्याची स्पर्धा, रांगोळी स्पर्धा तसेच चित्रकला स्पर्धा घेण्यात येणार आहेत. या स्पर्धांमधून विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता वाढवण्यासोबतच शिवचरित्राची प्रेरणा मिळावी, हा उद्देश आहे. स्पर्धांमुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आणि कार्य नव्या पिढीपर्यंत प्रभावीपणे पोहोचणार आहे.

याच अनुषंगाने छत्रपती शिवाजी महाराजांचा संपूर्ण जीवनपट उलगडणारा भव्य सांस्कृतिक कार्यक्रम व नाट्यप्रयोग छत्रपती संभाजीराजे नाट्यगृह, जळगाव येथे आयोजित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात नाट्य व सांस्कृतिक क्षेत्रातील नामवंत कलाकार सहभागी होणार असून, शिवचरित्रावर आधारित सादरीकरणातून उपस्थितांना एक प्रेरणादायी आणि भावनिक अनुभव मिळणार आहे.

किल्ले बनविण्याच्या स्पर्धेसाठी आवश्यक माती, बॅरिकेडिंग आणि मार्किंगची व्यवस्था जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात येणार आहे. चित्रकला स्पर्धेसाठी लागणारा कागदही प्रशासनाकडून उपलब्ध करून देण्यात येईल. मात्र किल्ल्याच्या सजावटीसाठी लागणारे साहित्य तसेच चित्रकलेसाठी आवश्यक रंग व इतर साहित्य स्पर्धकांनी स्वतः आणणे अपेक्षित आहे.

सर्व स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना प्रशस्तीपत्र देण्यात येणार असून उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या स्पर्धकांचा जिल्हास्तरावर सन्मान करण्यात येणार आहे. या कार्यक्रमांसाठी विविध मान्यवरांना निमंत्रित करण्यात येत असून लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी केले आहे.

दरम्यान, विद्यार्थ्यांची नावनोंदणी जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी कार्यालयामार्फत करण्यात येणार असून यासाठी शिक्षणाधिकारी (माध्यमिक) कल्पना चव्हाण यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शिवजयंती हा केवळ उत्सव न राहता तो प्रेरणा, शिस्त आणि राष्ट्रीय मूल्यांची जपणूक करणारा सोहळा ठरावा, अशी अपेक्षा जिल्हा प्रशासनाने व्यक्त केली आहे.

या नियोजन बैठकीस जिल्हाधिकारी रोहन घुगे, महानगरपालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, निवासी उपजिल्हाधिकारी वैशाली चव्हाण, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) कल्पना चव्हाण यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.


Protected Content

Play sound