मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | काँग्रेसमध्ये सध्या राजकीय खळबळ सुरू आहे. काँग्रेस आमदार हिरामण खोसकर आणि जितेश अंतापूरकर यांनी आज बुधवारी सकाळीच वर्षा या निवासस्थानी जावून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. विधान परिषद निवडणुकीत ज्या काँग्रेस आमदारांनी क्रॉस वोटींग केली होती त्यांच्यात या दोघांचाही समावेश होता असा आरोप आहे. विधानसभेच्या तोंडावर या दोघांवर कारावईचीही शक्यता आहे. त्याबाबतची शिफारसही पक्ष श्रेष्ठीकडे करण्यात आली आहे. त्यामुळे पक्ष कारवाई करण्याआधीच स्वत: पक्ष सोडण्याचा पर्याय या दोघांकडे आहे. त्यामुळेच या दोघांनी मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतल्याचे बोलले जात आहे.
जितेश अंतापूरकर हे नांदेड जिल्ह्यातील देगलूर विधानसभा मतदार संघातून विजयी झाले आहेत. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यामुळे ते शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. अंतापूरकर यांच्या प्रमाणे हिरामण खोसकर यांच्यावर क्रॉस वोटींग केल्याचा आरोप आहे. खोसकर हे काँग्रेसचे आमदार आहेत. त्यांनी नाशिक जिल्ह्यातील इगतपूरी विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला आहे. त्यांनी एकनाथ शिंदे यांच्याबरोबर जवळीक करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यामुळेच त्यांनीही जितेश अंतापूरकर यांच्यासह मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.