पुणे, प्रतिनिधी । सरकारमधील समन्वयासाठी दोन समित्या नेमण्यात येणार असून या माध्यमातून निर्णय प्रक्रिया होणार आहे. या समित्यांमुळे सरकारमध्ये नाराजीनाट्य निर्माण होणार नसल्याचा विश्वास महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला. ते आज येथील पत्रकार परिषदेत बोलत होते.
राज्य मंत्रीमंडळाच्या खाते वाटपानंतर पुण्यात पत्रकारांशी बोलतांना ना. बाळासाहेब थोरात म्हणाले की, सोमवारपासून सर्व खात्यांचे काम सुरू होईल. नव्या सरकारची वाटचाल समान किमान कार्यक्रमानुसार राहणार आहे. सरकारमधील समन्वयासाठी दोन समित्या नेमण्यात येणार आहेत. त्या माध्यमातून निर्णय प्रक्रिया होणार आहे. त्यात एक समिती कॅबिनेटची समिती असणार असून त्यात वरिष्ठ मंत्र्यांचा समावेश असेल. सरकारचे निर्णय, त्यावरचे संभाव्य मतभेद आणि परिणाम यासंदर्भातील बाबींकडे ही समिती लक्ष ठेवणार आहेत, या समितीमुळे सरकारमध्ये नाराजीनाट्य निर्माण होणार नसल्याचा आशावाद थोरात यांनी व्यक्त केला.
ना. थोरात पुढे म्हणाले की, महसुल खात्यात अधिक सुलभता आणण्यासाठी प्रयत्न केले जातील. त्याचबरोबर कर्जमाफीचा जो निर्णय सरकारने घेतला आहे. त्याची जबाबदारी या खात्याकडे दिला जाण्याची शक्यता आहे. तसेच व्यापारी वर्गाचे प्रश्न सोडविण्यासाठी, त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी एक कॉमर्स विभाग निर्माण करणे. तसेच राज्यातील देवस्थानांच्या त्याठिकाणी चांगल्या सोयी-सुविधा करण्यासाठी वेगळा विभाग तयार करता येईल का याची चाचपणी करण्यात येत असल्याची माहिती ना. बाळासाहेब थोरात यांनी याप्रसंगी दिली.