जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील कुसुंबा गावाजवळ मंगळवारी १२ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन एक दुचाकीस्वार जखमी झाल्याची घटना घडली आहे. अपघात घडल्यानंतर धडक देणारा दुचाकीस्वार घटनास्थळावरून फरार झाला. या प्रकरणी बुधवारी १३ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुप्रीम कॉलनी, जळगाव येथे राहणारे श्रावण जिब्रु राठोड (वय ४०) हे मंगळवारी १२ ऑगस्ट रोजी दुपारी आपल्या दुचाकीने (एमएच १९ डीपी २९९१) कुसुंबा गावाजवळील पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी जात होते. त्याचवेळी कुसुंबा गावाकडून येणाऱ्या दुसऱ्या एका दुचाकीने (एमएच १९ ईएम १७७८) त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

या अपघातात दुचाकीस्वार श्रावण राठोड हे जखमी झाले. अपघातानंतर धडक देणारा दुचाकीस्वार आपली दुचाकी घेऊन तात्काळ घटनास्थळावरून पसार झाला. जखमी श्रावण राठोड यांनी बुधवारी सकाळी एमआयडीसी पोलीस ठाण्यात या घटनेसंदर्भात फिर्याद दिली, त्यानुसार अज्ञात दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार झालेल्या दुचाकीस्वाराचा शोध पोलीस घेत आहेत.



