रावेर लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | रावेर पोलीस स्टेशनच्या हद्दीत राबवण्यात आलेल्या विशेष ‘कोंबिंग ऑपरेशन’ आणि नाकाबंदी दरम्यान पोलिसांनी दोन अट्टल दुचाकी चोरांना अटक करण्यात यश मिळवले आहे. त्यांच्याकडून चोरीच्या दोन मोटारसायकल जप्त करण्यात आल्या असून, शहरात अवैध धंदे करणाऱ्यांवरही मोठी कारवाई करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अब्दुल रफीक अब्दुल कादर यांची दुचाकी क्रमांक (MH-19-DW4895) ही दुचाकी लतिफ हॉल येथील एका लग्न समारंभाबाहेरून चोरीला गेली होती. याप्रकरणी रावेर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी शहरातील १५ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले, मात्र सुरुवातीला काहीही धागेदोरे हाती लागले नाहीत.

पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या आदेशानुसार रात्री शहरात नाकाबंदी करण्यात आली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात तपासणी सुरू असताना दोन संशयित तरुण दुचाकीसह आढळून आले. कागदपत्रांची मागणी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी कसून चौकशी केली असता, त्यांनी लतिफ हॉल येथून दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आमीर खान अजमल खान (वय १९, रा. खर्णी पुरा, यावल) आणि रोहीत अशोक बिन्हाडे (वय १८, रा. सिद्धार्थ नगर, यावल) अशी आहेत. त्यांच्याकडून एकूण ९४ हजार रुपये किमतीच्या दोन दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत.
या मोहिमेदरम्यान पोलिसांनी केवळ चोरांनाच नाही, तर इतर गुन्हेगारांनाही हिसका दाखवला. ४ जुगार अड्ड्यांवर छापे टाकून महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत कारवाई केली. तसेच सार्वजनिक ठिकाणी गांजा ओढणारे ३ जण आणि बेकायदेशीररीत्या गावठी दारू विकणारे २ जण यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
ही यशस्वी कारवाई पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल आणि त्यांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडली.



