बोदवड प्रतिनिधी । येथील नगरपंचायतीचे मुख्याधिकारी चंद्रकांत भोसले यांच्याशी अरेरावी, शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिल्याने दोघांना अटक करण्यात आली आहे.
याबाबत वृत्त असे की, बोदवड नगरपंचायतीचे मुख्याधिकारी चंद्रकांत भोसले यांनी येथील पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार बुधवारी नगरपंचायत कार्यालयात मुख्याधिकारी भोसले हे त्यांच्या सहकारी कर्मचार्यांसोबत काम करत होते. याप्रसंगी अकराच्या सुमारास शेख अकिल शेख इमाम व शेख जावेद शेख इमाम, दोघे रा. बोदवड यांनी थ्री फेज वीज कनेक्शनसाठी ना हरकत दाखला का दिला नाही, आम्ही अर्ज दिलेला होता या बाबत मुख्याधिकार्यांना विचारणा केली. त्यांनी कर्मचार्यांकडून माहिती घेऊन अर्जात त्रुटी असल्याचे कारण सांगितले. त्यामुळे राग आलेल्या त्या दोघांनी मुख्याधिकारी भोसले यांच्याशी अरेरावी करत शिवीगाळ केली. तसेच वीज कनेक्शन न दिल्यास जिवे ठार मारण्याची धमकी दिली.
या अनुषंगाने मुख्याधिकारी भोसले यांच्या फिर्यादीवरून आरोपी शेख अकील शेख इमाम व शेख जावेद शेख इमाम या दोघांविरुद्ध भारतीय दंड संहिता १८६० नुसार ३५३, ४५२, ५०४ व ५०६ नुसार गुन्हा नोंदवण्यात आला. दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे.