Home क्राईम बनावट कॉल सेंटर प्रकरणातील दोघांना मुंबईतून अटक !

बनावट कॉल सेंटर प्रकरणातील दोघांना मुंबईतून अटक !

0
193


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव येथील एल.के. फार्म हाऊस येथे सुरू असलेल्या बनावट कॉल सेंटर प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई करत, या कॉल सेंटरचे सूत्रधार असलेल्या दोन आरोपींना मुंबईतून अटक केली आहे. आदील सैयद निशार अहमद सैयद (वय ३२, रा. ओशिवरा, मुंबई) आणि अकबर खान रौनक अली खान (वय ४०, रा. मालाड पूर्व, मुंबई) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या दोघांना अटक झाल्यामुळे या प्रकरणात आतापर्यंत अटकेत असलेल्या आरोपींची संख्या दहा झाली आहे.

विदेशातील नागरिकांना वेगवेगळी आमिषे दाखवून त्यांची फसवणूक करणाऱ्या या बनावट कॉल सेंटरवर स्थानिक गुन्हे शाखा आणि उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांच्या पथकाने छापा टाकला होता. या कारवाईनंतर माजी महापौर ललित कोल्हे यांच्यासह इतरांवर गुन्हा दाखल झाला होता आणि आठ जणांना अटक करण्यात आली होती.

मुंबईतून केली अटक
हे दोन्ही आरोपी सतत आपली जागा बदलत होते. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिस पथकाने शुक्रवारी (२१ नोव्हेंबर) रात्री मुंबईतील एका फ्लॅटमधून आदील आणि अकबर या दोघांना शिताफीने ताब्यात घेतले. आता केवळ ऋषी उर्फ केशव राजू बेरिया (रा. मुंबई) याला अटक करणे बाकी आहे. कॉल सेंटरचे मुख्य सूत्रधार असलेले हे दोघे अटक झाल्याने फसवणुकीची रक्कम कोणाच्या बँक खात्यात जमा होत होती, तसेच विदेशातील त्यांचे हस्तक कोण आहेत, याची महत्त्वाची माहिती आता तपास यंत्रणांना मिळू शकते. या दोघांविरुद्ध यापूर्वीही मुंबईत आयटी ॲक्ट तसेच दंगल आणि इतर गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे.

२७ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी
आदील आणि अकबर यांना शनिवारी (२२ नोव्हेंबर) न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने त्यांना २७ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. उपविभागीय पोलिस अधिकारी आणि तपासाधिकारी नितीन गणापुरे यांनी न्यायालयात युक्तिवाद करताना, ‘कॉल सेंटरचा स्क्रिप्ट कोठून मिळाला, आंतरराष्ट्रीय रॅकेट कसे काम करत होते आणि त्यांची ललित कोल्हे यांच्याशी ओळख कशी झाली?’ याची माहिती घेण्यासाठी कोठडी आवश्यक असल्याचे सांगितले. यामुळे या रॅकेटची पाळेमुळे अधिक खोलवर तपासणे पोलिसांना शक्य होणार आहे.


Protected Content

Play sound