कल्याण-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील देवपे गावातील एका २७ वर्षाच्या तरुणाची दोन्ही हात तलवारीच्या साहाय्याने छाटून त्याला अपंग करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या गुन्ह्यातील दोन आरोपींना मुरबाड पोलिसांनी अटक केली आहे.
मुरबाड तालुका पंचायत समितीचा माजी सभापती श्रीकांत धुमाळ याचा नातेवाईक अंकुश खारीक, नितीन धुमाळ यांना पोलिसांनी अटक केली आहे. शुक्रवारी १५ डिसेंबर रोजी सायंकाळी बारवी धरण परिसरात गंभीर जखमी तरुण सुशील भोईर (वय-२७) याचे हात तलवारीने कापून टाकल्यानंतर माजी सभापती धुमाळ यांनी आपल्या सहकाऱ्याच्या मोबाईलवरून एका वजनदार राजकारण्याला संपर्क करून आपण ‘असा’ प्रकार केला आहे. या प्रकरणात सहकार्य करण्याची मागणी केली असल्याची चर्चा मुरबाड परिसरात आहे.
या हल्ल्यात श्रीकांत आणि नितीन धुमाळ, खारीक आणि इतर तीन आरोपींचा सहभाग असल्याची गुन्ह्यात नोंद आहे. माजी सभापती श्रीकांत धुमाळ याच्या इशाऱ्यावरून हा हल्ला झाला असल्याचे तक्रारदाराचे म्हणणे आहे. या हल्ल्याला मुरबाड परिसरात सुरू असलेल्या विकास कामांचे ठेके, पूर्ववैमनस्य आणि कौटुंबिक वादाची किनार असल्याचे स्थानिक ग्रामस्थांच्या चर्चेतून समजते. फरार आरोपींना राजकीय आशीर्वाद असल्याने पोलीस या आरोपींना पकडण्यात टाळाटाळ करत असल्याचे तक्रादाराच्या नातेवाईकांनी सांगितले. फरार आरोपी हे अंबरनाथ परिसरातील आपल्या नातेवाईकांकडे लपून बसले असल्याची ग्रामस्थांची खात्रीलायक माहिती आहे.